Join us

मुंबईत भाजप उर्वरित दोन्ही मराठी उमेदवार देणार; दक्षिण मुंबई मिळणार; ठाण्यासाठी शिंदे अडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 10:09 IST

आमच्या वाट्याला मुंबईतील चार जागा येतील, त्यातील किमान दोन उमेदवार मराठीच द्यावे लागतील, असे या नेत्याने सांगितले.

मुंबई : भाजपला महायुतीत मुंबईतील आधीच्या दोन जागांबरोबरच मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर-मध्य या आणखी दोन जागा मिळतील. दक्षिण- मध्य बरोबरच मुंबई उत्तर-पश्चिमची जागा शिंदेसेनेकडे जाईल. उर्वरित दोन्ही जागांवर भाजप मराठी उमेदवार देण्याची शक्यता अधिक आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

मुंबई उत्तरमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मुंबई उत्तर-पूर्वमधून आ. मिहीर कोटेचा असे दोन्ही बिगर मराठी चेहरे दिले आहेत. गोयल हे हिंदी भाषिक तर कोटेचा हे गुजराथी आहेत. आमच्या वाट्याला मुंबईतील चार जागा येतील, त्यातील किमान दोन उमेदवार मराठीच द्यावे लागतील, असे या नेत्याने सांगितले. पूनम महाजन यांना मुंबई उत्तर-मध्य मधून उमेदवारी द्यायची नाही, असा कोणताही निर्णय पक्षनेतृत्वाने अद्याप केलेला नाही, पण पूनम यांच्याबरोबरच अन्य पर्यायी नावांची चर्चा झालेली आहे. भाजपच्या वाट्याला येणार असलेल्या आणि काही जागांवरील उमेदवारांची नावे पक्षांतर्गत निश्चित झालेली आहेत, ती तुम्हाला एक-दोन दिवसात कळतील, असे ते म्हणाले. ठाण्याची जागा आम्हाला सोडा असा आग्रह भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला आहे, पण हे माझे शहर आहे, इथे माझ्याच पक्षाला संधी मिळायला हवी, असा शिंदे यांचा आग्रह आहे. 

दक्षिणमध्ये नार्वेकर? मुंबई दक्षिणची जागा शिंदेसेनेकडे गेली तर खा. मिलिंद देवरा आणि महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव अशी नावे चर्चेत होती. मात्र, आता ही जागा भाजपकडे जाणार, असे दिसत असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा अशी दोन नावे समोर आली आहेत. मात्र, नार्वेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई दक्षिणभाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४एकनाथ शिंदे