मुंबई - मी दक्षिण मुंबईचा दौरा यासाठी करतोय जेणेकरून इथून महायुतीचा उमेदवार निवडून यावा. मी माझ्या वैयक्तिक प्रचारासाठी फिरत नाही. या मतदारसंघात भाजपा आणि घटक पक्ष मिळून जो उमेदवार देतील तो निवडून आणण्याचं आमचे ध्येय आहे असं सूचक विधान भाजपा आमदार राहुल नार्वेकरांनी केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेमहायुतीत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली. मनसे महायुतीत आल्यास त्यांना दक्षिण मुंबईतील जागा देणार असल्याचं बोललं जाते. सध्या याठिकाणी अरविंद सावंत खासदार आहेत जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. भाजपाचे राहुल नार्वेकर या मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी करत होते. त्यातच मनसे येथून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देणार अशी चर्चा आहे. त्यावर राहुल नार्वेकरांनी म्हटलं की, या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून यावा त्यासाठी आम्ही भाजपा कार्यकर्ते काम करत आहोत. भाजपाने मला भरपूर काही दिलंय त्यामुळे अधिक मागण्याची गरज नाही. जो निर्णय पक्ष घेईल तो आम्ही मानू. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं त्यांनी सांगितले.
तसेच मनसेची ताकद मुंबईत आहे. भाजपा आणि मनसेची विचारधारा एकच आहे. त्यामुळे जर एकत्र आलो तर नक्की आमची ताकद वाढणार आहे. १० वर्षापासून इथं उबाठा गटाचा खासदार आहे. जिथे जिथे मी गेलो तिथे १० वर्षापासून खासदाराला पाहिलेच नाही असं लोक सांगतात. केंद्र शासनाशी निगडीत अनेक विषय आहेत ज्याबाबत इथल्या खासदाराने तोंडही उघडले नाही. भाजपाचे २ आमदार या मतदारसंघात आहे. इथं भाजपाचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु NDA जो उमेदवार देईल मग तो भाजपाचा असो वा घटक पक्षाचा त्यासाठी आम्ही मेहनतीने काम करू असं नार्वेकरांनी स्पष्ट केले.