Join us

NCP शरद पवार गटही उद्धव ठाकरेंवर नाराज; निर्णयाचा फेरविचार केला तर ठीक, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 2:37 PM

Loksabha election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या ६ जागांपैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यावरून महाविकास आघाडीत वाद होताना पाहायला मिळत आहे.

मुंबई - NCP Vidya Chavan on Uddhav Thackeray ( Marathi News ) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी १७ जागांच्या उमेदवारांची घोषणा केली. यात सांगलीसह मुंबईतील जागेंवरूनही महाविकास आघाडीत नाराजी पसरली आहे. मुंबईतील ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार घोषित केले. त्यात ईशान्य मुंबईचाही समावेश आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आग्रही असून ही आमच्या हक्काची जागा आम्हाला सोडावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीच्या मुंबई युनिटकडून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे मुंबईतील जागेसाठी मागणी होत आहे. याबाबत विद्या चव्हाण म्हणाल्या की, ईशान्य मुंबई जागेसाठी आमच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव अर्ज भरायला आणि लढायला तयार आहेत. मित्रपक्षाला विनंती आहे. ईशान्य मुंबईची जागा जर तुम्हाला देता येत नसेल तर दक्षिण मध्यची जागा आम्हाला सोडावी. शिवसेनेची निश्चित ताकद असेल परंतु आमची हक्काची जागा मिळायला हवी. मुंबईचे  राष्ट्रवादी कार्यकर्ते या यादीमुळे खूप नाराज झालेत. राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनही केले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुंबईच्या ६ जागांपैकी ठाकरे ४ जागांवर उमेदवार देत असतील तर ईशान्य मुंबई ही जागा आमच्या हक्काची आहे. आमच्याकडेही उमेदवार आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आम्ही विनंती करून त्यांनी जागा सोडली तर ठीक, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी विचार होऊ शकतो. शरद पवार, जयंत पाटील यांना विनंती आहे. मुंबईवर अन्याय होता कामा नये. ईशान्य मुंबईची जागा हवी. जबरदस्तीने आमची जागा बळकावली जात आहे असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. 

दरम्यान, आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा आम्ही कमी नाही. भांडण, रस्सीखेच वैगेरे नाही पण मुंबईतील हक्काची जागा आम्हाला मिळायला हवी. ईशान्य मुंबई द्यायची नसेल तर दक्षिण मध्य मुंबई द्यावी. आम्ही ताकदीने लढायला तयार आहोत. मित्रपक्षांनी याची दखल घेतली पाहिजे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढणार. आमची हक्काची जागा मिळायला पाहिजे हे पक्षश्रेष्ठीही मान्य करतील असं विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :मुंबई उत्तर पूर्वउद्धव ठाकरेशरद पवारलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४