मुंबई : तुमचा उमेदवार कोळीवाडे, गावठाण्यांत प्रचार करताना नाकाला रुमाल लावतो, असे म्हणत रविवारी मुंबई महिला काँग्रेसकडून कांदिवली पूर्व मतदारसंघात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. मुंबई उत्तर मतदारसंघात कोळी गावठाणे, कोळीवाड्यांत भूमिपुत्रांची संख्या मोठी आहे.
भाजपच्या उमेदवाराविरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने धारावी, वर्सोवा, मालाड, कुलाबा, माहूल गाव, चेंबूर, बोरिवली, माहीम, अंधेरी, गोराई, कांदिवली येथे आंदोलने करून घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई आगरी, कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून कांदिवली पूर्व भागातही मोर्चा कढल्यानंतर तेथील भाजप आणि काँग्रेस कायकर्ते एकमेकांना भिडले. या दरम्यान, गाड्याही फोडण्यात आणल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात नेले.
तुम्ही ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहत आहात तिथे नाकाला रुमाल लावून प्रचार करणे म्हणजे कोळी बांधवांच्या व्यवसायाचा अपमान आहे. याचाच निषेध आम्ही केला; मात्र त्याला भाजप कार्यकर्त्यांमुळे हिंसक वळण लागले. -भूषण पाटील, उपाध्यक्ष, मुंबई काँग्रेस
पदाधिकाऱ्यांना केली मारहाणकाँग्रेसचे काही कार्यकर्ते आमच्या कांदिवलीच्या कार्यालयासमोर येऊन शिवीगाळ करू लागले. तुमचे उमेदवार नाकावर रुमाल ठेवून कोळीवाड्यात फिरतात, असे म्हणत त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. आमच्या एका कार्यकर्त्याला बराच मार लागला आहे.- नीलाबेन सोनी, प्रसिद्धी प्रमुख, भाजप