मुंबई - तुमच्यातील अंतर्गत वाद नंतर मिटवा; पण त्याआधी लोकसभा निवडणुकीत एकजूट करून काम करा, अशा सूचना उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते पीयूष गोयल यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआयच्या कार्यकर्त्यांना केल्या.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयच्या उत्तर मुंबईतील कार्यकर्त्यांचे संमेलन बुधवारी सायंकाळी कांदिवली येथे पार पडले. त्यावेळी गोयल यांच्या प्रचारासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन आठवले यांनी केले. मात्र, प्रमुख नेते येण्याआधी आरपीआयच्या काही नेत्यांनी आपल्या भावना मंचावरून मांडताना, महायुतीचे कार्यक्रम आरपीआयच्या स्थानिक नेत्यांशी समन्वय साधून करावेत, फलकावर आठवले यांचा मोठ्या आकारातील फोटो लावण्यात यावा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. ४०० जागा जिंकून भाजप सरकारला घटना बदलायची आहे, या विरोधकांकडून सुरू असलेल्या प्रचाराचे पडसाद या संमेलनात उमटले.
त्याला उत्तर देताना आठवले यांनी इंदू मिलमधील स्मारकाला दिलेली जमीन आणि निधी, संविधान दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराची फडणवीस सरकारच्या काळात झालेली खरेदी इत्यादी दाखले देत मोदी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा योग्य सन्मान केल्याचे सांगितले, तसेच हे सरकार संविधान बदलणे शक्यच नाही, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.