Join us

दक्षिण मध्य मुंबईतील दाेन्ही उमेदवारांच्या प्रचारातून वडाळा, चेंबूरचे प्रदूषण गायब?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:56 AM

या परिसरातील लोकांमध्ये श्वसनामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण लक्षणीय आहे.

मनोज गडनीस 

मुंबई : मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात यंदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा गाजायला सुरुवात झाली असली तरी याच मतदारसंघात असलेल्या वडाळा आणि चेंबूरमधील प्रदूषणाच्या मुद्याकडे मात्र अद्याप दोन्ही प्रमुख उमेदवारांचे फारसे लक्ष न गेल्याचे चित्र आहे. या लोकसभेसाठी शिंदेसेनेतर्फे राहुल शेवाळे, तर उद्धवसेनेतर्फे अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या मतदारसंघात तेल कंपन्यांचे प्रकल्प आहेत. त्यातील चिमण्या चोवीस तास धूर ओकत असतात. तर वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रोचे कामही सुरू आहे. तसेच, विविध मेट्रो प्रकल्पांसाठी पुरवल्या जाणाऱ्या गर्डरची निर्मितीही प्रतीक्षानगरजवळ होते. यामुळे येथील हवेत धुळीचे प्रमाण मोठे आहे. चेंबूर सुमननगरहून वाशीला जाणाऱ्या रस्त्यावरही मेट्रोचे काम सुरू असल्याने तिथे वाहतूककोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. 

प्राप्त माहितीनुसार, या परिसरातील लोकांमध्ये श्वसनामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण लक्षणीय आहे. खेरीज डेंग्यू, हिवताप आदी साथीच्या रोगांचे प्रमाणही आहे. त्यामुळे कचरा व प्रदूषण या दोन्ही मुद्यांना प्राधान्यक्रम देऊन सोडविले गेले तर येथील मतदारांच्या आरोग्याची काळजी घेतल्यासारखे होईल. त्यामुळे उमेदवारांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील मतदार करत आहेत.

आमच्या मतदारसंघात धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, अणुशक्तीनगर, चेंबूर या ठिकाणी अनेक झोपडपट्ट्या तसेच दाटीवाटीची वस्ती आहे. घाणीचे साम्राज्य आहे. वडाळा ब्रीज, ॲन्टॉप हिल, मान खुर्द, चित्ता कॅम्प, देवनार येथे गर्दी, दुर्गंधी, वाहनांचे व अन्य प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. - राजेश चव्हाण, मतदार 

आमच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. त्याने होणारी धूळ त्रासदायक आहे. दिवाळीत प्रदूषण वाढले तेव्हा हिरव्या जाळ्या आणि पाणी मारण्याचे काम झाले. मात्र, नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आमच्यासाठी आरोग्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. -  संजय जाधव, वडाळा

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई दक्षिण मध्य