मुंबईत ठाकरे गटाचा काँग्रेस-NCP ला ठेंगा; ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:31 IST2024-03-27T16:30:41+5:302024-03-27T16:31:50+5:30
Congress NCP Upset on Uddhav Thackeray: मविआत ठाकरे गटाची पहिली यादी येताच नाराजीनाट्य उफाळून आले आहे. मुंबईतील ६ पैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे.

मुंबईत ठाकरे गटाचा काँग्रेस-NCP ला ठेंगा; ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं पहिली उमेदवार यादी जाहीर करताच महाविकास आघाडीत वाद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईतील ४ जागांवर उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलेत. त्यात दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर तर ईशान्य मुंबई संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली आहे.
ईशान्य मुंबईच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आग्रही होते. या मतदारसंघातून राखी जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यासाठी मागील काळात कार्यकर्त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती. परंतु ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी घोषित केल्यानंतर हे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी ठाकरेंच्या उमेदवार यादीविरोधात घोषणाबाजी केली.
याबाबत कार्यकर्ते म्हणाले की, ईशान्य मुंबईतून राखी जाधव या आमच्या उमेदवार होत्या. त्यांना तिकीट मिळालं असते तर मुंबईत राष्ट्रवादीनं ही जागा जिंकून आणली असती. त्या विरोधी पक्षाच्या गटनेत्या राहिल्या आहेत. ईशान्य मुंबई ही जागा आम्हाला सुटावी अशी मागणी आहे. आम्हाला आमची पक्षसंघटना वाढवायची आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शरद पवार, जयंत पाटील यांच्या नेतृ्त्वात मुंबईत काम करतोय असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत मुंबईतला एकतरी मतदारसंघ मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं विधान प्रवक्ते अमोल मातेले यांनी केले आहे.
काँग्रेसनेही व्यक्त केली नाराजी
मुंबईत जागावाटपाबाबत काँग्रेस २ जागांवर आग्रही होती. त्यात दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसला हवी होती. परंतु दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले. आघाडीत चर्चा सुरू असताना अशारितीने उमेदवारी जाहीर करणे योग्य नाही. ठाकरेंनी आघाडी धर्म पाळावा, अजूनही वेळ गेली नाही, निर्णयाचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी करत ठाकरेंच्या उमेदवार यादीवर नाराजी व्यक्त केली.