उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:40 AM2024-04-27T06:40:17+5:302024-04-27T06:41:06+5:30
२७ नोव्हेंबर २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर आता जवळपास १८ वर्षांनी राज ठाकरे धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतदान करणार आहेत.
मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या गणितांमुळे यंदा प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांना काहीशा विचित्र योगाचा सामना करावा लागणार आहे. आजवर ज्या पक्षाला विरोध केला ते आघाडीत आल्यामुळे आणि एका पक्षातून बाहेर पडत स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावरही पुन्हा आधीच्या पक्षालाच मतदान करण्याची वेळ या पक्षप्रमुखांवर आली आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याच लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे यंदा उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे काँग्रेसचे पक्षचिन्ह असलेल्या हाताच्या निशाणीवर प्रथमच मतदानाची मोहोर उमटविणार आहेत. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी उद्धव यांनी माझे मत वर्षाताईलाच अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
तर, दुसरीकडे मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे. राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणादरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेने राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शेवाळे यांना धनुष्यबाण हे शिवसेनेचे परंपरागत चिन्ह मिळालेले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे हे ठाकरे कुटुंबीय धनुष्यबाणाच्या चिन्हाचे बटण दाबणार आहेत. २७ नोव्हेंबर २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर आता जवळपास १८ वर्षांनी राज ठाकरे धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतदान करणार आहेत.