ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:34 PM2024-05-20T12:34:31+5:302024-05-20T12:35:38+5:30
Loksabha Election - मुंबईकर महाविकास आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल देत ६ पैकी ६ जागा निवडून देतील असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
मुंबई - Sachin Ahir on BJP ( Marathi News ) मुलुडं इथं पैशाचे वाटप सुरू असताना आमच्या कार्यकर्त्यांनी पकडले तिथे आमच्याच कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल केला. आता लोकांकडे गुगल पे आयडी घेतलेत. याची तक्रारही आम्ही दिलीय. लोकांकडून गुगल पे का मागितले जातायेत. ही निवडणूक पैशाच्या जोरावर आणि प्रशासनाचा वापर करून निवडून यायचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी या लोकांना घरी बसवायचं हे मुंबईकरांनी ठरवलंय असं म्हटलं आहे.
मतदान केल्यानंतर सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, घाटकोपरमध्ये श्रीरामांचे फोटो लावून स्टेज बांधलं आहे. आता विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाऊ शकत नाही ते भाजपाला कळालं आहे. आम्ही याबाबत तक्रार केली आहे. हा रडीचा डाव आहे. प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. व्यापाऱ्यांना तुम्हाला इथे उद्योग करायचे आहे असं पोलीस सांगतायेत. या सर्वांची नोंद घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार दिलीय असं त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईकर नेहमी स्पष्टपणे कौल देणारा आहे. भाजपाविरोधात इथं लाट आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना तिकीट नाकारणे, पूनम महाजनांना उमेदवारी न देणे याचा अर्थ मुंबईतील हवा ही भाजपाविरोधी जातेय हे त्यांना कळलं होते. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना रोड शो करावा लागला. योगी आदित्यनाथांना यावं लागलं. संपूर्ण भाजपाची टीम, विकासक त्या त्या मतदारसंघात फिरताना दिसतायेत. त्यामुळे त्यांचा विजय होणार नाही हे स्पष्ट आहे असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आम्ही चांगली लढत दिली आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे. मुंबईतील ६ पैकी ६ उमेदवार निवडून देण्याचं काम मुंबईकर करतील. २००४ असेल किंवा गेली निवडणूक पाहा, मुंबईकर स्पष्ट कौल देतो. २०१९ मध्ये आम्ही एकत्र होतो, तेव्हाही स्पष्ट कौल दिला होता. यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने लोक कौल देतील. मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय होतोय. अनेक योजना मुंबईकरांना लाभल्या नाहीत. त्यातून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम केलं जातंय त्याला मुंबईकर मतदानाच्या माध्यमातून चोख उत्तर देतील असं अहिर यांनी सांगितले.