नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:05 AM2024-05-18T10:05:39+5:302024-05-18T10:06:30+5:30
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपतोय. मात्र तत्पूर्वी खासदार संजय राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
मुंबई - Sanjay Raut on Narendra Modi ( Marathi News ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच घाटकोपर इथं रोड शो केला. यावरून उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. मोदींच्या रोड शो साठी ३ कोटी ५६ लाख रुपये इतका खर्च मुंबई महापालिकेतून केला असा दावा राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी ५६ लाख रुपये जो खर्च झाला तो मुंबई महापालिकेने केला. ३ कोटी ५६ लाख रुपयाचं ओझं मुंबई महापालिकेनं भाजपाच्या रोड शोसाठी वाहिले. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्याबद्दल भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मी पंतप्रधान म्हणत नाही. भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा किंवा ३ कोटी ५६ लाख रुपये भाजपाच्या किंवा जिथे हा रोड शो झाला तिथल्या उमेदवाराच्या खर्चातून केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच ही महापालिकेच्या तिजोरीची लूट आहे. पंतप्रधान मुंबई येतात, मुंबई बंद करतात, कालसुद्धा मुंबईत आले अर्धा दिवस मुंबई बंद. आजसुद्धा योगी येतायेत. मुंबई बंद हे काय चाललंय, तु्म्ही तुमच्या हिंमतीवर या. मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही. मुंबईच्या तिजोरीवर भार टाकताय हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. रोड शोचा खर्च ताबडतोब वसूल केला पाहिजे. जे काही सत्य आहे ते मुंबई महापालिका आयुक्तांनी समोर आणावं असं संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, विलेपार्ले इथं रेमडिसीवीरचा साठा पकडला तेव्हाही देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जात हंगामा करत होते. जिथे जिथे चोरीचा माल तिथे तिथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक. मिहिर कोटेचाचे पैसे पकडले आहे. पैसे वाटप केले जातायेत. चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला गृहमंत्री फडणवीस तिथे येतात. दरोड्याचा माल तिथे फडणवीस, ४० आमदार, ५० खोके तिथेही फडणवीस. हे चोरांचे सरदार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.