मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 11:48 AM2024-05-06T11:48:14+5:302024-05-06T11:49:37+5:30
ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे उमेदवार आहे. मात्र घाटकोपरमध्ये गुजराती बहुल भागात त्यांना प्रचार करण्यास थांबवलं असा प्रकार समोर आला आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात मराठी आणि गुजराती असा वाद पुन्हा उफाळून आला आहे. एकीकडे मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही अशी एका कंपनीकडून जाहिरात प्रसिद्ध झाली. हा वाद ताजा असतानाच आता मुंबईतील घाटकोपर परिसरात मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यात गुजराती बहुल सोसायटीने मज्जाव केल्याचा दावा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे उमेदवार आहे. मात्र घाटकोपरमध्ये गुजराती बहुल भागात त्यांना प्रचार करण्यास थांबवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गटाचे पदाधिकारी घाटकोपर भागात प्रचार करत होते. मात्र याठिकाणी गुजराती लोकांची वस्ती असलेल्या समर्पण सोसायटीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना थांबवले. आतमध्ये प्रचार करू नका असं त्यांना सांगितल्याचा आरोप आहे.
याबाबत ठाकरे गटाचे शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर म्हणाले की, घाटकोपर पश्चिम येथे एका सोसायटीत जाताना तिथल्या रहिवाशांनी आम्हाला अडवले. तेव्हा आम्ही विचारणा केली तर मराठी माणसांना आम्ही बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही असं त्यांनी म्हटलं. आम्ही संविधानाप्रमाणे परवानगी घेऊन प्रचार करतोय. गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, घाटकोपर इथे एका सोसायटीत जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, तिथे मराठी असल्याने शिवसैनिकांना रोखले. आता ते काय करतायेत. शिवसेना फडणवीस गट काय करते हा प्रश्न आहे. मराठी माणसांविरोधात सुरू असलेले कटकारस्थान हा प्रश्न आहे. आम्ही काय करायचे ते बघू, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आव्हान स्वीकारले आहे. आमची खरी शिवसेना म्हणणारे यावर काय बोलतायेत हे बघू अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.