मुंबई - दक्षिण मुंबईतील लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांचा ५२ हजार ६७३ मतांनी विजय झाला आहे. अरविंद सावंत यांना निवडणुकीत ३ लाख ९५ हजार ६५५ मते मिळाली तर यामिनी जाधव यांना ३ लाख ४२ हजार ९८२ मते मिळाली. अरविंद सावंत यांच्या विजयाच्या आघाडीत मुंबादेवी आणि भायखळा येथील मतांचा मोठा वाटा आहे.
विधानसभा निहाय मते
विधानसभा निहाय मते | अरविंद सावंत, उबाठा गट | यामिनी जाधव, शिवसेना |
शिवडी मतदारसंघ | 76,053 | 59,150 |
भायखळा मतदारसंघ | 86,833 | 40,817 |
मलबार हिल मतदारसंघ | 39,573 | 87,860 |
मुंबादेवी मतदारसंघ | 77,469 | 36,690 |
कुलाबा मतदारसंघ | 48,913 | 58,645 |
वरळी मतदारसंघ | 64,844 | 58129 |
त्यामुळे विधानसभा निहाय मतांची आकडेवारी पाहिली तर जेमतेम ६५०० मतांनी वरळीतून अरविंद सावंत यांना आघाडी मिळाली आहे. तर शिवडी मतदारसंघातून १६९०० मतांची आघाडी सावंत यांना मिळाली आहे. हे दोन्ही मतदारसंघ मराठी बहुल भाग मानले जातात. मात्र त्याठिकाणी अरविंद सावंत यांना फार मोठी आघाडी मिळाली नाही. मात्र मुंबादेवी आणि भायखळा या भागातून जवळपास ४० हजारांची आघाडी अरविंद सावंत यांना मिळाली. या मतदारसंघात एमआयएमनं उमेदवार दिला नव्हता. त्याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला झाला. तर मराठी बहुल भागातील कमी मताधिक्य उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारे आहे.
वरळीत आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा
वरळी मतदारसंघात खुद्द आदित्य ठाकरे आमदार आहेत. त्या मतदारसंघात केवळ ६५०० मतांची आघाडी अरविंद सावंत यांना मिळाली. या मतदारसंघात शिवसेनेचे २ विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यात सचिन अहिर, सुनील शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील याच मतदारसंघातील आहेत. त्यामुळे याठिकाणची आघाडी ठाकरेंसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे.