Eknath Shinde ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येत महायुती केली आहे. भाजपने लोकसभा उमेदवारांसाठी पहिल्या यादीत २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेतील शिंदे गटातील उमेदवारांच्या नावांची घोषणा दोन दिवसात होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत दिल्लीत बैठका सुरू आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १३ उमेदवारांच्या नावांची यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी
लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाने दिल्लीत पाठवली आहे. या यादीत १३ जणांची नावे आहेत. २० जागांसाठी आधीच भाजपने नावे घोषित केली आहेत. आता ४८ जागांपैकी १३ जागा या शिवसेना शिंदे गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यातील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांचीच नाव या यादीत असल्याचे बोलले जात आहे. या आधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, या बैठकीत काही जागांवर उमेदवार बदलण्याबाबत अमित शाह यांनी सूचना केल्या होत्या, यानंतर शिंदे गटाने खासदारांची बैठक घेतली होती. पण, अजुनही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. काही जागांवर अजुनही पेच कायम आहे.
शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ संभाव्य उमेदवारांची यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवली आहे. दरम्यान, आता येत्या ४८ तासात राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
राज्यात लोकसभेच्या एकून ४८ जागा आहेत. भाजपने पहिल्या यादीत २० जागांची घोषणा केली आहे. आता शिंदे गटाला १३ जागा दिल्या तर आणखी १५ जागामधील काही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहेत, तर राहिलेल्या जागांवर भाजप आपले उमेदवार देणार आहे. भाजप राज्यात ३० ते ३२ लोकसभेच्या जागा लढवू शकते अशी चर्चा सुरू आहे.