Join us  

४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 9:33 AM

Loksabha Election - ५ जूनला अर्धा भाजपा फुटणार असा दावा उद्धव ठाकरेंनी करताच ४ जूनला शरद पवारांचा पक्ष आणि उद्धवची सेना फुटणार असं प्रत्युत्तर भाजपानं दिले आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात ४ जूननंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांचा पक्ष फुटणार असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे. उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये केलेल्या विधानानंतर मोहित कंबोज यांनी हा दावा केला आहे.

मोहित कंबोज म्हणाले की, ४ जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांचा पक्ष यांच्यातील अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी पक्षाला राजीनामा देतील. या पक्षातील अनेक नेते सध्या महायुतीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्यात फिरसे खेला होबे होईल असं विधान त्यांनी केले आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

कोविड काळात भाजपानं महाराष्ट्र सरकारला नव्हे तर पीएम केअर फंडाला पैसे दिले. त्याचा हिशोब कुणी मागत नाही. मोदी ४ तारखेनंतर पंतप्रधान होणार नाहीत. ज्यारितीने तुम्ही नोटबंदी जाहीर केली तसं महाराष्ट्र जाहीर करतोय, ४ जूननंतर तुम्ही नरेंद्र मोदी असाल, तुम्ही पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसल्यानंतर पीएम केअर फंड कोण हाताळणार? मला भाजपाची काळजी, कुणी एकेकाळी ते आपल्यासोबत होते. तुम्ही पंतप्रधान होणार नाहीत, पण आणखी २ वर्षाने तुम्ही झोळी लटकावून जाल, मग भाजपाची हालत काय होईल? मोदींनी भाजपाची चिंता करावी. ५ तारखेला अर्धा भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

मोदींचाही ठाकरे-पवारांवर पलटवार

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो केला, यावेळी मोदींनी पवार-ठाकरेंवर पलटवार केला, नकली शिवसेना, नकली NCP यांच्याकडे आहे, त्यांचा पक्ष कुणी घेऊन जात असेल तर ते झोपले होते का? अशांना एकही मत देता कामा नये. ज्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार?, हे आता रडत आहेत. त्यांच्या कौटुंबिक वादातून पक्ष फुटले त्याचा हा परिणाम आहे असा टोला मोदींनी ठाकरे-पवारांना लगावला.

टॅग्स :भाजपाउद्धव ठाकरेशरद पवारलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४