जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 07:53 AM2024-05-06T07:53:49+5:302024-05-06T07:55:11+5:30
Loksabha Election - भाजपा नेते आशिष शेलार आणि उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी वडेट्टीवार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मुंबई - Ashish Shelar on Vijay Vadettiwar ( Marathi News ) कसाब किंवा दहशतवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्वल निकम यांच्या विरोधात केलेल्या विधानाची तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष शेलार यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली असून त्यांनी वडेट्टीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत वांद्रे पश्चिम येथील निवडणूक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी माहिती दिली. यावेळी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम उपस्थित होते. माझ्याकडे बरीच माहिती आहे. माझ्या पोतडीत बरेच काही आहे पण देशहित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी, काही बोलत नाही, असा गर्भित इशारा उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसला दिला आहे तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. वड्डेटीवार पाकिस्तानला जे हवेय तेच का बोलत आहेत, असा सवालही निकम यांनी केला.
तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी संशय निर्माण करणारी विधान केली, जी न्यायालयीन निवाड्याच्या विरोधातली आहेत, जी सत्य घटनेवर आधारित नाहीत, ती खोटी आणि असत्य आहेत आणि म्हणून केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या पद्धतीचे विधान केले गेले आहे. हे विधान बदनामी करणारे असून भावना भडकवण्याचा आणि या निवडणुकीमध्ये असत्य पसरवण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर आणि वडेट्टीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशा पद्धतीची तक्रार आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे असं शेलारांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाला आम्ही काही थेट प्रश्न विचारू इच्छितो की, कसाब हा आतंकवादी होता, कसाबने गोळ्या झाडल्या, न्यायालयाने त्याच्यावर निवाडा दिला, आरोपीला शिक्षा झाली. मग जी भाषा पाकिस्तान करत आहे तीच भाषा काँग्रेस का करतेय? या विषयावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. कसाबला झालेली शिक्षा, कसाबने आपल्यावर आतंकवादी केलेला हमला, कसाबच्या मागे असलेला पाकिस्तानी आतंकवादी हात, आणि निवाडा जो न्यायालयाने दिला, यावर उबाठाचे मत काँग्रेसच्या समर्थनाचे आहे की नाही ? याचाही खुलासा करावा. वडेट्टीवार आणि काँग्रेस जे बोलत आहे ते उबाठा गटाला मान्य आहे का? असा सवालही शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारला.