मुंबई-
लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर होताच महाविकास आघाडीमध्ये धुसपूस सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून मुंबईतील तीन जागांसाठी आज तीन उमेदवार जाहीर करण्यात आले. यात वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला आहे. "ज्या उमेदवारावर कोविड काळात कामगारांना वाटण्यात आलेल्या खिचडीच्या कंत्राटदारांकडून दलाली घेतल्याचे आरोप आहेत, अशा खिचडीचोर उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाही", असा हल्लाबोल संजय निरुपम यांनी केला आहे.
"मुंबईतील सहा पैकी पाच जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जबरदस्तीने उमेदवार जाहीर केले आहेत आणि काँग्रेसला वाट्याला लाचारासारखी एक जागा सोडली आहे. यासाठी मी शिवसेना नेतृत्वाचा आणि काँग्रेसकडून जे लोक या वाटाघाटीत सामील होते त्यांचाही निषेध करतो. एकेकाळी मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेसचं प्राबल्य होतं तिथं आज जर केवळ एक जागा काँग्रेसच्या वाट्याला येत असेल तर मुंबई काँग्रेसचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात आहे. काँग्रेस नेतृत्त्वाने याचा विचार करायला हवा", असं संजय निरुपम म्हणाले.
अमोल किर्तीकरांवर केले गंभीर आरोप"ठाकरे गटाकडून वायव्य मुंबईसाठी जारी केलेल्या उमेदवाराविरोधात सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कोविड काळात खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत. अशा खिचडीचोर उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही. काँग्रेस नेतृत्वाकडून आमच्या भावना जाणून घेतल्या गेल्या नाहीत. आजवर येथील उमेदवारीबाबत कुणीच माझ्याशी चर्चा केली नाही. कार्यकर्त्यांच्या भावना देखील जाणून घेतल्या गेल्या नाहीत. अजूनही आम्ही आठवडाभर वाट पाहू, नाहीतर माझ्यासमोरचे सर्व पर्याय खुले आहेत", असा इशाराच संजय निरुपम यांनी दिला आहे.