मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 04:17 PM2024-06-10T16:17:47+5:302024-06-10T16:19:09+5:30

आपले प्रश्न आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करू शकणारा एकमेव नेता म्हणून मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला असं बोललं जातं.

Loksabha Result 2024 - Muslim voters support Shiv Sena 'Mashal' in Mumbai; How did a bunch of votes turn to Uddhav Thackeray?  | मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 

मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 

मुंबई - शिवसेना फुटीनंतर राज्यातील पहिल्याच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी २१ उमेदवारांमधून ९ खासदार निवडून आणले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली. त्यात मुंबईतील ६ पैकी ४ मतदारसंघात ठाकरेंनी त्यांचे शिलेदार उभे केले. यातील ३ जणांनी निवडणुकीत बाजी मारलीय. त्यामुळे मुंबईत 'आव्वाज' आपलाच, असं ठाकरे गटाचे सैनिक ठासून सांगत आहेत.

या लोकसभा निकालातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, उद्धव ठाकरेंनी मुस्लीम मतांची 'व्होट बँक' आपल्याकडे वळवण्यात मोठं यश मिळवलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे बरेच मुस्लीम शिवसेनेपासून दूर राहत होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे मुस्लीम मतदार यंदा ठाकरेंच्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिक झाला आणि त्याचे यशात रूपांतर झाल्याचेही निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून दिसते. 

मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मानखुर्द, कुर्ला, गोवंडी, अणुशक्ती नगर, भायखळा, मुंबादेवी यासारख्या अनेक मुस्लीम बहुल भागात उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला भरभरून मतदान झाले. त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या भागात उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून आलेत. मुंबईतील ६ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यात वर्षा गायकवाड यादेखील काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. 

दक्षिण मध्य मुंबईचा निकाल पाहिला तर या मतदारसंघात भायखळ्याच्या मताधिक्याने अरविंद सावंत यांचा विजय सुकर केला. भायखळा विधानसभेतून सावंत यांना सर्वाधिक ८६,८८३ मते पडली तर यामिनी जाधव यांना केवळ ४०,८१७ मते मिळाली. दक्षिण मध्य मुंबईत माहिम विधानसभेची आकडेवारी पाहिली तर या ठिकाणी राहुल शेवाळे यांना १४ हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. ज्या भागात शिवसेना भवन, शिवाजी पार्क हा भाग येतो. तर, अणुशक्ती नगर येथे ज्या भागाचं नेतृत्व नवाब मलिक करतात तिथे ठाकरेंच्या उमेदवाराला २९ हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. त्या पाठोपाठ धारावी येथूनही देसाईंना ३७ हजारांचं मताधिक्य मिळालं त्यामुळे या दोन्ही मतदारसंघामुळे अनिल देसाईंचा विजय सुकर झाला. 

ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी महायुतीच्या मिहिर कोटेचा यांचा पराभव केला. या मतदारसंघाचा निकाल पाहिला तर मुस्लीम बहुल मानखुर्द भागात कोटेचा यांना २८ हजार तर संजय दिना पाटील यांना १ लाख २० हजार मते पडली. तर भांडुप पश्चिमेतून संजय दिना पाटील ३४५८ मतांनी आघाडीवर होते. विक्रोळीत १५, ८६५ आणि घाटकोपर पश्चिमेतून १५७७२ मतांनी संजय दिना पाटील यांना आघाडी मिळाली. ईशान्य मुंबईच्या मताधिक्यात सर्वाधिक वाटा हा मानखुर्द शिवाजी नगर भागाचा आहे. ज्याठिकाणी अबु आझमी हे आमदार आहेत. 

एक गठ्ठा मतदानामागचं (राज)कारण?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली मुस्लीम मतं, या संदर्भात लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं. ते म्हणाले, ''मुस्लीम समाज उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने का गेला? तो तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ करणारा समाज असतानाही, हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातो या कारणांचाही शोध घेतला पाहिजे. आपले प्रश्न आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करू शकणारा एकमेव नेता म्हणून मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला. हाच विश्वास त्या समाजाला इतर कोणत्याही पक्षाबद्दल वाटला असता तर हा समाज त्या पक्षासोबत गेला असता. उद्या जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन आपला फायदा झाला नाही, आपले प्रश्न भाजपच मांडू शकतो असे जर त्यांना वाटले तर हा समाज भाजपसोबत जायला मागे पुढे करणार नाही."

एक गठ्ठा मतदानामागचा विचार, मानसिकता यावर राजकीय पक्षांनीही सर्वांगाने विचार करायला हवा, याकडे अतुल कुलकर्णी यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले, "मुस्लीम समाजाने एक गठ्ठा मतदान काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केले, असे सांगितले जाते. पण याआधी याच समाजाने मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपलाही मतदान केले होते हे विसरता येणार नाही. मागच्या दोन निवडणुकीत गुजराती समाजानेही लोकसभेसाठी एक गठ्ठा मतदान केले. त्याची तशी चर्चा होत नाही. मराठी मतदान मागच्या दोन निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला झाले होते, ते आपण गृहित धरतो. मात्र लोक एकत्रित येऊन कुठल्याही एकाच पक्षाला का मतदान करतात? याच्या कारणांचा शोध फारसा घेतला जात नाही. आपल्या विरोधात मतदान केले की एक गठ्ठा मतदान झाले असे म्हणायचे आणि आपल्या बाजूने मतदान झाले की लोकांनी विचारपूर्वक मतदान केले, अशी भूमिका घ्यायची हे योग्य वाटत नाही. राजकीय धुरिणांनी याचा विचार करायला हवा, पण आपल्याकडे तो होताना दिसत नाही.

महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मुंबईतील मुस्लिम मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता वाढली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपलं म्हणणं अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले त्यामुळेच मुंबईतील ४ पैकी ३ जागांवर आम्हाला विजय मिळाला - आनंद दुबे, शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते

Web Title: Loksabha Result 2024 - Muslim voters support Shiv Sena 'Mashal' in Mumbai; How did a bunch of votes turn to Uddhav Thackeray? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.