प्रतिभावंतांसाठी लंडन सदैव खुले, लंडनचे महापौर मुंबई भेटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:14 AM2017-12-04T04:14:38+5:302017-12-04T04:14:47+5:30
व्यावसायिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांमधील प्रतिभावान व्यक्तींसाठी लंडन नेहमीच खुले आहे. तेथील प्रशासनही अशा व्यक्तींसाठी अनुकूल आहे, असे प्रतिपादन लंडन शहराचे महापौर सादिक खान यांनी केले
मुंबई : व्यावसायिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांमधील प्रतिभावान व्यक्तींसाठी लंडन नेहमीच खुले आहे. तेथील प्रशासनही अशा व्यक्तींसाठी अनुकूल आहे, असे प्रतिपादन लंडन शहराचे महापौर सादिक खान यांनी केले. मुंबई भेटीवर आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
लंडनचे महापौर असलेले सादिक खान सध्या भारत आणि पाकिस्तानच्या दौºयावर आहेत. रविवारी कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सादिक खान यांच्या दौºयाची रविवारी मुंबईमधून सुरुवात झाली. या दौºयात मुंबईतील विविध कार्यक्रमांतही ते सहभागी होणार आहेत.
सादिक खान हे इंग्लंडमधील लेबर पार्टीचे प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ९ मे २०१६ पासून ते लंडनचे महापौर आहेत. लंडनचे ते तिसरे महापौर आहेत. ते २००९ ते २०१० या दरम्यान ब्रिटनमध्ये केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री होते, ११ वर्षे ते खासदारही होते.
मुंबई भेटीत खान म्हणाले की, उद्योजक, राजकीय नेते, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सामान्य भारतीय यांचे लंडन नेहमीच स्वागत करेल. लंडन जगातील सर्वांत मोठ्या आर्थिक राजधानींपैकी एक आहे. तिथली परिस्थिती सर्वांसाठी अनुकूल आहे. लंडनमधील टेक्निकल हब आणि व्यवसायांसाठी सर्वाेत्तम जागा या व्यवसायवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
भारत-पाकिस्तान भेटीबाबत विचारले असता खान म्हणाले की, मोठ्या कालावधीनंतर ब्रिटिश महापौर एकाच वेळी भारत आणि पाकिस्तान भेटीसाठी आलेला आहे. दुसºया महायुद्धानंतर या दोन्ही देशांतील असंख्य लोकांनी व्यवसायासाठी, नोकरी-धंद्यांसाठी ब्रिटनची वाट धरली. त्यानंतरच्या त्यांच्या पिढ्या लंडनमध्येच वाढल्या. त्यामुळे दोन्ही देशांमधील लोकांचे ब्रिटनशी उत्तम संबंध निर्माण झाले.