गरीब घरच्या आशिषसाठी उघडली लंडनची दारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2016 02:11 AM2016-09-03T02:11:01+5:302016-09-03T02:11:01+5:30
वांद्रे; मुंबई येथील एका चाळीत राहणारा आशिष जाधव पुढील आठवड्यात लंडनला जाणार असून तेथील क्रिस्टल पॅलेस इंग्लिश प्रीमियर लिग क्लबमध्ये तो प्रशिक्षण घेणार आहे.
मुंबई - वांद्रे; मुंबई येथील एका चाळीत राहणारा आशिष जाधव पुढील आठवड्यात लंडनला जाणार असून तेथील क्रिस्टल पॅलेस इंग्लिश प्रीमियर लिग क्लबमध्ये तो प्रशिक्षण घेणार आहे. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी आईवडील त्याला टाकून निघून गेले. आजी आणि काकांच्या आश्रयाने वाढलेला आशिष आता लंडनला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
नेहा आणि विकास हे दोन तरुण सहकारी जस्ट फॉर किक्स ही केवळ फुटबॉलसाठी समर्पित असलेली एनजीओ चालवितात. महापालिकांच्या शाळा आणि अत्यंत कमी उत्पन्न गटातील मुले शिकतात अशा खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेतर्फे मुंबई, पुणे, बंगलुरु आणि हैदराबाद येथे केले जाते. या चार शहरांत लंडनमधील क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी २२२५ मुलांमधून ज्या दहा मुलांची निवड झाली त्यात आशिषचा समावेश आहे.
आशिषला पासपोर्ट मिळण्यात मोठी अडचण आली ती त्याच्या पालकांची. त्याचा सांभाळ तर काकांनी केला पण ते त्याचे पालक असल्याची कायदेशीर कागदपत्रे तयार करून घेण्याची त्यांना कधी गरजच पडली नव्हती. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय मदतीला धावले. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुममध्ये इंटर्नशिप करणाऱ्या रोहन या पंचवीशीतील चार्टर्ड अकाऊन्टंटने त्यासाठी धावपळ केली. नियमांच्या चौकटीपेक्षा माणुसकीला प्राधान्य देत क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी यांनीही सहकार्य केले आणि आशिषचा पासपोर्ट तयार झाला.
आशिष दहावीपर्यंत सांताक्रूझ महापालिका शाळेत शिकला. आता तो अंधेरीतील एका कॉलेजमध्ये अकरावीत आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याला फुटबॉलची आवड आहे. त्याचे सहा जणांचे कुटुंब असून मासिक उत्पन्न १५ हजार रुपये इतकेच आहे. (विशेष प्रतिनिधी)