'लॉकडाऊनमधील एकाकीपणा आत्महत्यांना कारणीभूत'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 03:44 AM2020-06-17T03:44:45+5:302020-06-17T03:44:57+5:30
मानसोपचारतज्ज्ञांचे मत : ४ दिवसांत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १८ जणांनी संपविले जीवन
- पोपट पवार
कोल्हापूर : कोरोनामुळे एकीकडे मानवी जीवन भयभीत झाले असताना दुसरीकडे मानसिक आरोग्याच्या समस्येने अनेकांना विळखा घातला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची मात्रा शोधली खरी, मात्र लॉकडाऊनकाळात बेरोजगारी, एकटेपणाची भावना, नैराश्य अशा अनेक नानाविध समस्यांनी मानवी मने पोखरली गेली आहेत. परिणामी, या काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचा दावा मानसोपचारतज्ज्ञांनी केला आहे.
लॉकडाऊनपूर्वीच जे विविध कारणांनी निराशेच्या गर्तेत गेले होते, त्यांना लॉकडाऊनने एकटेपणाची जाणीव करून देत अधिकच कमकुवत बनविल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याची शक्यता पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निश्रीन सैफ यांनी व्यक्त केली. गेल्या चार दिवसांत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १८ जणांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आत्महत्या करणाऱ्यांपैकी सर्वचजण तिशीच्या आतले असून, ताण-तणावातूनच त्यांनी स्वत:ला संपविल्याचे समोर आले आहे.
विज्ञान शाखेची पदवी हातात घेऊन समाजाला विज्ञानाशी एकरूप करू पाहणारा गडहिंग्लजचा संभाजी चव्हाण असो की दोरीचा फास काय असतो हे समजण्याआधीच त्याच फासाला लटकवून उभं आयुष्य अल्पावधीतच सोडणारी अवघ्या बारा वर्षांची करवीर तालुक्यातील नेहा शिंंदे असो... बेरोजगारीला कंटाळून इहलोकी गेलेल्या सातारच्या दत्तात्रय गहिनेने जीवनात हरलो हे कबूल केले असेलही, पण हातात नोकरी असूनही क्षुल्लक कारणावरून आयुष्याला कवटाळणाºया संभाजी चव्हाणला हे जग इतक्या लवकर नकोसं का झालं याचे उत्तर अनुत्तरित आहे.
या सर्वांची कारणे वेगवेगळी असली तरी हे सर्वजण ताणतणावाच्या काळ्याकुट्ट छायेत आपले जीवन काळवंडत राहिले. परिणामी ते मानसिक आरोग्याची शिकार बनल्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने पुढे काय या चिंतेनेच अनेकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. स्वत:कडे कौशल्य असूनही नोकरी टिकवता आली नाही. परिणामी, मानसिक खच्चीकरण, कुटुंबाचे काय, समाज आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह तर उभा करणार नाही ना? अशी भीती वाटू लागल्यानेच बेरोजगार झालेले आत्महत्येकडे वळत असावेत, असे पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीशा साठे यांना वाटते. तर नोकरी गेल्यानंतर एकांगीपणाचा भास होत असल्याने अनेकजण निराशावादी बनतात. आपल्याला आधार देणारे कुणीच नाही, आपण कुणाकडे मदत मागितली तर ते देतील का? मदत मागणेही अपमानजनक वाटत असल्याने अनेकजण आत्महत्या करू, पण कुणाकडे हात पसरायला नको या मानसिकतेतून जीवनाचा शेवट करत असल्याचे मेंदू अभ्यासक श्रुती पानसे यांनी सांगितले. आयुष्यभर ताठ बाण्याने जगणाºया व्यक्तींनाही लॉकडाऊनने झुकायला लावले. मात्र, कुणाकडे मदत मागण्याची वेळ आल्यावर मात्र हीच स्वावलंबी मने विरून जाणे पसंत करत असल्याची भीती पानसे यांनी व्यक्त केली.
मानसिक प्रतिकारशक्तीचा अभाव
अलीकडच्या काळात लहान मुलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले असून, त्याला सर्वस्वी पालक आणि मानसिक प्रतिकारशक्तीचा अभाव हेच मुख्य कारण असल्याचे डॉ. श्रीशा साठे यांनी सांगितले.
मुलांच्या मानसिक स्थितीकडे- वाढीकडे पालक लक्ष देत नसल्याने त्यांची आंतरबाह्य मने ओळखता येत नाहीत. मुलांचे संगोपन करताना अगदी त्यांच्याशी मोकळा संवाद, खेळ, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचा आहार यातून मानसिक प्रतिकारशक्ती वाढविणे शक्य आहे; पण पालकांकडून हे प्रयत्न
होत नसल्याने मालिका, गेम यातूनच मुले आपली स्वत:ची शैली बनवत आहेत. परिणामी, त्यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचे पडसाद उमटतात.