एकाकी आणि उपेक्षित...
By admin | Published: October 1, 2015 02:22 AM2015-10-01T02:22:02+5:302015-10-01T02:22:02+5:30
वृद्धांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले.
मनीषा म्हात्रे , मुंबई
वृद्धांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हीच स्थिती आहे. पोलिसांच्या हेल्पलाइनवर दिवसाला १५ ते २० ज्येष्ठ नागरिकांचे मदतीसाठी फोन खणखणत आहेत. त्यामुळे आजही वृद्धांकडून आम्ही एकटे आणि असुरक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
देशात वृद्धांवरील अत्याचारांचे एकूण १८ हजार ७१४ गुन्हे दाखल झाले. त्यात १९ हजार ८ वृद्ध पीडित आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ३ हजार ९८१ गुन्हे दाखल आहेत. त्यातही गंभीर बाब म्हणजे बलात्काराच्या घटनांनाही वृद्धांना सामोरे जावे लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरामध्ये तब्बल १६ लाख वयोवृद्ध नागरिक राहतात. शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १३ टक्के आहे.
वयोवृद्ध नागरिकांची सुरक्षा आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी मुंबई पोलिसांची १०९० ही हेल्पलाइन सेवा कार्यरत आहे. जानेवारी २०१४ पर्यंत तब्बल ४० हजार वयोवृद्धांची नोंदणी करण्यात आली. मात्र हेल्पलाइनवर नोंदणी तसेच तक्रारींचा तपशील जतन करण्याचे काम एका खासगी कंपनीकडे होते. हा सर्व तपशील गहाळ झाल्याने नव्याने तपशील गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्यासाठी एमटीएनएलची सेवा घेऊन १०९० सोबतच १२९१ ही हेल्पलाइन आणि ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.हमारीसुरक्षा.कॉम’ ही नवीन वेबसाइट सुरू करण्याचे ठरविले होते. मात्र वृद्धांचा गुप्त डेटा वेबसाइटवर ठेवणे सुरक्षित नसल्याने ही वेबसाइट सुरू करण्यापूर्वीच बंद करण्यात आली. १२९१ या हेल्पलाइन क्रमांकाचा प्रस्तावही अजून कागदावरच आहे.
मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या तब्बल १६ लाख वृद्ध नागरिकांची सुरक्षा आणि सेवेसाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेली
या हेल्पलाइनसाठी दोन पोलीस कर्मचारी सातही दिवस २४ तास कार्यरत आहेत. घरातील दूध, गॅस संपल्यापासून ते घरगुती तंटे सोडविण्याबाबतच्या कॉल्सने हेल्पलाइन खणखणत आहे.
एकटेपणाबरोबरच कुटुंबीयांकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत वृद्ध या हेल्पलाइनच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. त्यातही पोलिसांकडून एकटे राहणारे, वयोवृद्ध जोडपे, कुटुंबासह राहणारे असे गट तयार करून त्यांची यादी तयार करण्यात येते.
हे वयोवृद्ध ज्या परिसरात वास्तव्यास आहेत तेथील पोलीस ठाण्यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या अडचणी, तक्रारी जाणून घेत सुरक्षेच्या दृष्टीने मदत करण्यात येत असल्याचे हेल्पलाइन नियंत्रक फिरोज पटेल यांचे म्हणणे आहे.
वृद्धांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील - देवेन भारती
हेल्पलाइनच्या मदतीने आम्ही ज्येष्ठांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेत असल्याचे कायदा व सुव्यवस्था पाहणारे देवेन भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यातही संस्थांच्या मदतीने जास्तीत जास्त उपाययोजना अमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तरुणाई बनतेय वृद्धांचा आधार!
१आयुष्याच्या संध्याकाळी अनेक वृद्ध एकाकी आयुष्य जगत आहेत. घरामधील व्यक्ती त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. शेजारी त्यांच्याशी बोलत नाहीत. तर काहींना कोणीच नसते. अशा वेळी थकलेली शरीरे अजूनच खंगत जातात. पण, अशा ज्येष्ठांच्या आयुष्याला तरुणाई नवसंजीवनी देत आहे.
२आजची तरुण पिढी ही नेहमीच स्वत:चा, नोकरी, पैशांचा विचार करते. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या ‘रिलेशनशिप’लाच महत्त्व असते, अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण यापलीकडे जाऊन काही तरुण मंडळी वृद्धांचा आधार बनत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी मंडळी वेळ काढून ज्येष्ठांबरोबर वेळ घालवत असल्याचे हेल्प एज इंडियाचे अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले.
३एका कॉर्पोरेट कंपनीतील १५ ते २० तरुण-तरुणी हे संध्याकाळचा वेळ अथवा सुटीच्या दिवशी ज्येष्ठांना भेटण्यासाठी येतात. त्यांच्या घरी जाऊन ज्येष्ठांशी गप्पा मारतात. तर त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू त्यांना आणून नेतात. त्यांना घेऊन बागेत फिरायला जातात. जीवनशैलीच्या बरोबरीनेच कार्य संस्कृतीतही बदल झाले आहेत.
४आता प्रत्येक आॅफिस हे चकाचक असते. ज्येष्ठ नागरिक काम करत असताना त्यांनी असे आॅफिस पाहिले नव्हते. हेल्पएजने एकदा ६० ते ७० ज्येष्ठ नागरिकांना कॉर्पाेरेट आॅफिसमध्ये नेले. तेथे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या काळाशी जोडले गेल्याची भावना व्यक्त केली. अशा अनेक मार्गांनी सध्या तरुणाई वृद्धांचा आधार बनत असल्याचे बोरगावकर यांनी सांगितले.
आधार
कोण देणार?
मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट करून त्याला शिकवले. मात्र लग्नानंतर याच मुलाला माझी अडचण होईल, असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. अखेर त्याने नाकारल्यानंतर सध्या भाड्याच्या घरात मी एकटीच राहत आहे. घरकाम करून स्वत:चा उदरनिर्वाह करत असल्याचे मुलुंडमधील वृद्धेने सांगितले.
...अन् तिला रस्त्यावर फेकले
वयाच्या ८५ व्या वर्षी आजाराने विव्हळत असलेल्या हंसा राजपूत यांच्या मुलाने त्यांना बॉम्बे सेंट्रलच्या रस्त्याच्या कडेला फेकले. जुलै महिन्यात घडलेल्या या घटनेने राजपूतांच्या वेदनेने सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आजही आपला मुलगा येईल, या आशेने त्या जी टी हॉस्पिटलमध्ये घटका मोजत आहेत.
ठोस पावले
उचलणे गरजेचे
वृद्धावस्थेत मुलांनी फिरवलेली पाठ, त्यात वाढती गुन्हेगारी अशात एक एक दिवस काढणे कठीण होत आहे. वृद्धांच्या सुरक्षेबाबत शासनाने आणखीन ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक राजेश निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मुलांनी पुढाकार
घेणे गरजेचे...
वृद्धांच्या मदतीसाठी त्यांच्या मुलांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या वयात मदतीची गरज असते अशा वेळी वृद्ध आई-वडिलांना नाकारणे चुकीचे आहे. स्वत:च्या स्वार्थ हेतूने त्यांना वेगळे करण्यात येते. मुळात उद्या हीच वागणूक तुम्हालाही मिळू शकते.