मुंबई : कोरोनाचा विषाणू जगात दाखल होऊन वर्ष उलटून गेले आहे, मात्र तरीही सुरुवातीच्या टप्प्यात संसर्ग झालेल्या रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतरही लाँग कोविडचा सामना करावा लागतोय. कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रदीर्घ काळ शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांनी आपल्या प्रकृतीची अधिक काळजी घेण्याचे आवाहन कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी केले आहे.द जर्नल अमेरिकन मेडिकल असोसिएशनतर्फे रोम, इटलीच्या फॉण्डाझिऑन पॉलिक्लिनिको युनिव्हर्सिटॅरिओ अगोस्टिनो जेमिल्ली आयआरसीसीएसने १४३ रुग्णांचा केलेला अभ्यास नुकताच प्रकाशित करण्यात आला. रुग्णालयाच्या ओपीडीत आलेल्या कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा यात अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासाअंती असे दिसून आले की, कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी ८७.४ टक्के रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर जवळपास २ ते ३ महिन्यांपर्यंत आजाराची लक्षणे दिसत होती. कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांवरही या संसर्गाचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून येत आहेत. कोरोनानंतरच्या रिकव्हरीच्या काळात रुग्णांनी डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक असते. आवश्यक असलेल्या काही तपासण्या, जीवनशैलीतील बदल किंवा औषधोपचार याविषयी डॉक्टर योग्य तो सल्ला देऊ शकतील. डॉक्टरी सल्ल्यानुसारच औषधे घ्या, असे मत वैद्यकीय टास्क फोर्सच्या डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले आहे.लाँग कोविड म्हणजे काय? कोविड होऊन गेल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांना लाँग कोविडची लागण झाल्याचे म्हटले जाते. यात केवळ दीर्घकाळ अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांचाच समावेश नसून ज्या रुग्णांना कोविडची अगदी सूक्ष्म लक्षणे दिसून आली आणि ज्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरजही भासली नाही, अशा रुग्णांचाही यात समावेश आहे. थकवा येणे, कमी हालचालीनंतरही श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, स्नायुदुखी आणि सांधेदुखी, ऐकू कमी येणे, दृष्टिदोष, वास न येणे आणि तोंडाची चव जाणे ही लाँग कोविडची सर्वसाधारण लक्षणे आहेत. लाँग कोविड झालेल्या बऱ्याचशा रुग्णांना मानसिक स्वास्थ्यविषयक समस्याही उद्भवल्याचे दिसून आले आहे. यात तणाव, चिडचिड यापासून डिप्रेशनपर्यंतच्या लक्षणांचा समावेश आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतरही ‘लाँग कोविड’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 1:55 AM