मुंबई : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. सध्या संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, अजूनही कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित झालेल्या रुग्णांना लाँग कोविडमुळे आरोग्यविषयक तक्रारी असल्याचे समोर आले आहे. लाँग कोविडची ही समस्या गंभीर असून, तज्ज्ञांनी वेळीच वैद्यकीय सल्ला अन् उपचार घेण्याची सूचना केली आहे. कोरोना संसर्गामुळे बाधितांना आता पॅण्डेमिक फटिगचा (थकवा) त्रास जाणवू लागल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले. कोरोनाची पहिल्या टप्प्यात असणारी भीती कमी झाली असली, तरीही या नव्या जीवनशैलीशी जुळवून घेताना तणाव व नैराश्यातून बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना आता या थकव्याचा अनुभव येऊ लागला आहे. अनेकांना अस्वस्थता, थकवा येत असल्याची माहिती संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी दिली आहे. नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी लाँग कोविडबद्दल सांगितले की, यापूर्वी आरोग्यविषयक आलेल्या साथींनंतर पार्किसन्स व नैराश्याच्या समस्या वाढल्याचे निरीक्षण होते. तसेच, मेंदूच्या तक्रारीही अनेक रुग्णांमध्ये आढळल्या होत्या. त्यामुळे आता कोरोनानंतरच्या आरोग्य समस्यांचा अभ्यास तज्ज्ञांकडून सुरू आहे.
९० टक्के रुग्ण सहा महिन्यांत होताहेत बरेलाँग कोविडची समस्या अनुभवलेले ९० टक्के रुग्ण सहा महिन्यांत बरे होत असल्याचे दिसून आले आहे. तर पाच टक्के रुग्णांना सहा ते एक वर्षाचा कालावधी बरा होण्यास लागला. तर अन्य रुग्णांना आयुष्यभर एखाद्या आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
अशी घ्या काळजीतज्ज्ञांच्या मते, लाँग कोविडशी झुंज देणाऱ्या लोकांना मल्टीडिसिप्लिनरी आणि मल्टी केअर ॲप्रोचने बरे केले जाऊ शकते. सोबतच सकस आहार, चांगली झोप आणि सकारात्मक विचार यामुळे लाँग कोविडवर मात करता येऊ शकते.