मुंबई : उन्हाळ्याची सुट्टीनिमित्त, तसेच फिरायला जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट प्रवाशांकडून एक-दोन महिने अगोदरच काढली जातात. मात्र, सध्या देशात कोरोनाग्रस्त संशयित रुग्ण आढळून आल्याने, अनेक प्रवाशांनी आगाऊ आरक्षण रद्द केले आहे. परिणामी, मध्य आणि पश्चिम रेल्वेला कोट्यवधीचा फटका बसला आहे.
१२ मार्च रोजी ६५ हजार ९४३ प्रवाशांचे आरक्षण बुकिंग झाले होते. मात्र, यापैकी २२ हजार ४४१ प्रवाशांनी म्हणजे सुमारे ३४.३ टक्के प्रवाशांनी आरक्षण रद्द केले. त्यामुळे मध्य रेल्वेला दिवसाला सुमारे १ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा फटका बसला. पश्चिम रेल्वे मार्गावरील १ मार्च ते १२ मार्च दरम्यान ५ लाख २७ हजार ४५ प्रवाशांनी आरक्षण रद्द केले.
मध्य रेल्वे मार्गावर १० मार्च रोजी ११ हजार ११५, ११ मार्च रोजी २० हजार १९२ प्रवाशांनी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे दरदिवशी ५० लाख ते १ कोटीचा फटका रेल्वेला बसत आहे. आरक्षण रद्द करण्याचा परतावा मध्य रेल्वेला भरून द्यावा लागत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील ११ मार्च रोजी ४६ हजार ९५२, १२ मार्च रोजी ५३ हजार ८३२ प्रवाशांनी तिकीट आरक्षण रद्द केले आहे.प्रवाशांची संख्या घटली पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज७ लाख ७७ हजार ८३७ प्रवासी प्रवास करतात. मात्र, ९ मार्च रोजी ७ लाख ५० हजार ८२८, १० मार्च रोजी ५ लाख २७ हजार ३४२ प्रवासी, ११ मार्च रोजी ७ लाख ७८ हजार २८२ कोटी, तर १२ मार्च रोजी ७ लाख २७ हजार ४०८ प्रवाशांनी प्रवास केला. मध्य रेल्वे मार्गावरून फेब्रुवारीत दरदिवशी ४४.६ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, मार्च महिन्यात या संख्येत घट झाली असून, १० मार्च रोजी ४२.२ लाख प्रवाशांनी प्रवास केला.‘हॉटेलचे बुकिंग ५० टक्क्यांनी घटले’कोरोनाचा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी ग्राहकांच्या संख्येवर फार परिणाम झालेला नसला तरी मांसाहार खाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. चिकन खाणाºयांचे प्रमाण खूप कमी झाले असून, सीफूड आणि मटण खाणाºयांचे प्रमाण जैसे थे आहे. सोबतच हॉटेलच्या रूम बुकिंगमध्ये ५० टक्क्यांनी घट झाल्याचे ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. कोरोनाबाबत हॉटेल रेस्टॉरंटमधील कर्मचाºयांनी स्वच्छता ठेवावी, सातत्याने हात धुवावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले.