१ हजार ६८८ प्रवासी मुंबईत दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटन व अन्य देशांतून बुधवार सकाळपर्यंत १ हजार ६८८ प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. यापैकी ७४५ प्रवाशांना मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले, तर अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात क्वारंटाइन होण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र सलग दुसऱ्या दिवशीही विमानतळावर गोंधळ हाेता. लांबच्या लांब रांगा आणि त्रासलेले प्रवासी असे चित्र होते.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आल्याने तेथून येणारी विमान सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र हा निर्णय होण्यापूर्वी ब्रिटनवरून पाच विमाने मुंबईत येणार होती. यापैकी सोमवारी आलेल्या विमानातून ५९१ प्रवासी मुंबईत यापूर्वीच आले आहेत. तर मंगळवारी रात्री १० ते बुधवार सकाळी १० पर्यंत १ हजार ६८८ प्रवासी मुंबईत आले. सर्व परदेशी प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आल्याने पहिल्या दिवशी विमानतळावर गोंधळ उडाला होता.
बुधवारीही यात सुधारणा झालेली दिसून आली नाही. विमानतळावर कोणत्याही प्रकारचा समन्वय दिसून आला नाही. माहिती वेळेत मिळत नसल्याने रांगेत तासन् तास उभ्या असलेल्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चाचणीबाबतही संभ्रम असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. नियोजन चांगले असले तरी योग्य पद्धतीने अंमलबजावणी न झाल्याने गोंधळ उडाला, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली.
मंगळवार रात्री १० ते बुधवार सकाळी १० वाजेपर्यंत आलेले प्रवासी
एकूण अपेक्षित प्रवासी - दोन हजार
प्रत्यक्षात आलेले प्रवासी - १६८८
मुंबईत क्वारंटाइन - ७५४
अन्य राज्यात पाठविले - ६०२
मध्य पूर्व देशातील प्रवासी - ३३९
अपरिहार्य कारणामुळे घरी पाठविले - दोन
..................