मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल बंद असल्याने सर्वसामान्यांना बेस्टने प्रवास करावा लागत आहे. अजून अनेकांचे लसीकरण बाकी असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जसे की बस मिळविण्यासाठी तासन्तास रांगेमध्ये उभे राहावे लागणे, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी तसेच येण्या जाण्यास लागणार वेळ अशा विविध समस्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे.
चंद्रकांत म्हात्रे म्हणाले की सध्या लोकल बंद असल्याने मी बसनेच प्रवास करत आहे. मी सध्या साकी नाक्याला निघालो आहे. मात्र मला येथे रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. बस कधी येईल हे काय सांगू शकत नाही, मात्र कधी कधी अर्धा तास घेते तर कधी कधी एक ते दीड तास उभे राहावे लागते. वाहतूक कोंडीचा त्रासदेखील सहन करावा लागत आहे. रस्त्यात असलेली वाहतूक कोंडी, जागोजागी पडलेले खड्डे या कारणांमुळे येण्या-जाण्यासदेखील उशीर होत आहे.
नरेश रायकर म्हणतात की माझे दोन डोस घेऊन २० ते २५ दिवस झाले मात्र तरीदेखील लोकलचे तिकीट मला मिळाले नाही. पास घ्या म्हणतात, मात्र एका दिवसासाठी पास घेणे परवडत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या नातेवाइकाचे वर्षश्राद्ध होते. मला विरार येते जाणे भाग होत, मात्र बससाठी रांगेत उभे राहण्यास एक तास गेला. नंतर वाहतूक कोंडी असल्यामुळे पोहोचण्यास विलंब झाला.
मुंबईच्या विविध भागातून हजारो लोक कामानिमित्त बाहेर पडत असतात. लोकल बंद असल्याकारणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा ताण हा बेस्टवर आला आहे. बसस्थानकानावर लांबच लांब रांगा असल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
किशोर वैद्य म्हणाले की सध्या प्रत्येक स्थानकावर मला एक ते दीड तास उभे राहावे लागते. वेळ तसेच पैसादेखील जातो. काही वेळा बसमधून उभे राहून जावे लागते. काही वेळा बस भरलेली असते, त्यामुळे बस थांबतदेखील नाही.