Join us

मंत्रालय बंद व्हायची वेळ झाली तरी प्रवेशासाठी लांबच लांब रांग; सामान्यांची ससेहोलपट

By दीपक भातुसे | Published: October 27, 2023 5:55 AM

‘लोकमत’ने या रांगेतील नागरिकांशी संवाद साधला.

दीपक भातुसे,  लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणाऱ्या महायुती सरकारच्या दारी आलेल्या सामान्यांची सध्या मंत्रालयातील प्रवेशासाठी ससेहोलपट होत आहे. मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध घातल्यापासून मागील काही आठवडे प्रवेशासाठी लांबलचक रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रालय बंद होण्याची वेळ आली तरी ही रांग संपलेली नव्हती.

‘लोकमत’ने गुरुवारी संध्याकाळी सव्वापाच वाजता या रांगेतील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी संताप व्यक्त करीत पोलिस एवढ्या उशिरा आम्हाला प्रवेश देत आहेत. आता आमचे काम कसे होणार? अधिकारी, कर्मचारी घरी जाण्याची तयारी असताना कोण भेटणार? असे लाेक विचारतात. प्रवेशासाठी दिल्या जाणाऱ्या पासवर दुपारी २ ते ५:३० अशी पासच्या वैधतेची वेळ असते. एका नागरिकाचा पास ५:१२ वाजता दिला गेला होता. ही व्यक्ती रांगेत शेवटी उभी होती. ५:३० च्या आत त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळणे कठीण होते, प्रवेश मिळाला तरी बंद झालेली कार्यालये बघण्याची वेळ आली असणार.

मंत्रालयात सामान्यांसाठी दुपारी दोननंतर गार्डन गेटवरून प्रवेश दिला जातो. पूर्वी प्रवेशासाठी फोटो पास काढल्यानंतर तत्काळ प्रवेश दिला जात होता; मात्र आता प्रवेश पास घेतल्यानंतर प्रवेशासाठी वेगळी रांग लावावी लागते. ही रांग अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याने सर्वसामान्यांना ताटकळत उभे राहावे लागते.

 

टॅग्स :मंत्रालय