Join us

माहीमच्या लसीकरण केंद्रावर लांबलचक रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:06 AM

बीकेसी आणि सायन केंद्रावर लसटंचाई निर्माण झाल्याने वाढली गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माहीममधील लसीकरण केंद्रावर शनिवारी लांबलचक ...

बीकेसी आणि सायन केंद्रावर लसटंचाई निर्माण झाल्याने वाढली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माहीममधील लसीकरण केंद्रावर शनिवारी लांबलचक रांगा लागल्या. बीकेसी आणि सायन केंद्रावर लसटंचाई निर्माण झाल्याने येथे गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले.

राज्यभरात सध्या लसींची टंचाई असल्याने लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहेत. त्यामुळे ज्या केंद्रावर लस उपलब्ध असेल, तेथे नागरिकांची गर्दी वाढत आहे. माहीमच्या लसीकरण केंद्रावर दादर आणि लगतच्या परिसरातील नागरिक लसीकरणासाठी येत असतात, परंतु शनिवारी बीकेसी आणि सायन येथील केंद्रावर लसटंचाई निर्माण झाल्याने तेथे रांग लावलेल्यांनी माहीममधील केंद्राकडे धाव घेतली. त्यामुळे या केंद्रावर लांबलचक रांगा लागल्याने डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्चमाऱ्यांची तारांबळ उडाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. रांगेतील काही जणांना दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली जात होती. मात्र, नागरिकांकडून त्यांच्या विनंतीला केराची टोपली दाखविण्यात आली.

यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले. त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे लांबलचक रांगेत उभे राहावे लागल्याने, प्रशासनाच्या कामकाजाविरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकार मुख्यमंत्री, महापौर आणि पालिका आयुक्तांच्या निर्दशनास आणून देण्यासाठी पत्रव्यवहार केला असून, लसीकरण केंद्रांत वाढ करण्याची मागणी केल्याची माहिती राष्ट्राभिमानी सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत पळ यांनी दिली.

..........................................