Join us

मुंबईसह पश्चिम उपनगरांत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 11:08 AM

आज सकाळी भाईंदर ते दहिसर चेक नाका क्रॉस करायला तब्बल दोन तास लागले. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहे.

मुंबई :  पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येक वाहनांची पोलीस तपासणी करत असून आज सकाळी भाईंदर ते दहिसर चेक नाका क्रॉस करायला तब्बल दोन तास लागले. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. दरम्यान, कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार व प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी या सरकारच्या अनेक तुघलकी निर्णयाच्या परंपरेमधील पुढचा निर्णय असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

एकीकडे लॉकडाऊन संपला आहे, लोकांना संचाराला मुभा आहे, असे म्हणत असताना कुठलीही पूर्वसूचना न देता कालपासून लोकांना 2 किमी परिघ क्षेत्राच्या बाहेर जाताना पोलिसांनी काल प्रवाशांची अडवणूक केली. आज देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे स्वाभाविक सामाजिक अंतराच भानसुद्धा विसरलं गेलं आणि या सगळ्यातून लोकांच्या हालअपेष्टामध्ये अधिकच भर पडली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय घेणारे कोण? याची चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी आपल्या पत्रकाद्वारे केली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवयाचा होता ,परंतु राष्ट्रवादी अध्यक्षांच्या दबावामुळे लॉकडाऊन उठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि अशा द्विधा मनस्थितीत सापडल्यामुळे मागच्या मार्गाने लॉकडाऊन आणण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचीच कबुली एकप्रकारे राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या निर्णयातून देत आहेत, अशीही टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे. हा तुघलकी स्वरूपाचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी