मुंबई : देशात बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाल्याचा सांख्यिकी अहवाल दडपल्याचा आरोप करीत केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर तरुणांचे नेतृत्व करणाऱ्या ७० हून अधिक संघटना एकवटल्या आहेत. भाजपा सरकारने सत्तेवर येण्याआधी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता कधी करणार, असा सवाल विचारत संघटनेने दिल्लीतील लाल किल्ला ते संसद मार्गपर्यंत ७ फेब्रुवारीला धडक मोर्चाची हाक दिली आहे.मुंबई पत्रकार संघात गुरुवारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत यंग इंडिया अधिकार मार्चने दिल्लीतील लाँग मार्चची माहिती दिली. तरुणांच्या दिल्लीतील नेत्या कवलप्रीत कौर यांनी सांगितले की, सरकारनेच केलेल्या सर्वेक्षणात गेल्या ४५ वर्षांतील सर्वांत जास्त बेरोजगारी २०१८ मध्ये आढळली असल्याचे चित्र समोर आले आहे. याला सरकारी धोरण कारणीभूत आहे. कंत्राटीकरणाच्या नावाखाली सरकारी जमिनी खासगी कंपन्यांच्या घशात घातल्या आहेत. त्याऐवजी सरकारने स्वत: जबाबदारी घेत केंद्र व राज्य पातळीवर रिक्त असलेली २४ लाख पदे तातडीने भरण्याची गरज आहे. याच प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी तरुणाई रस्त्यावर उतरणार आहे. या मुद्द्याला घेऊन सर्व विद्यापीठांसह देशातील विविध भागांत जनजागृती सुरू असल्याचेही कौर यांनी स्पष्ट केले.जीवन सुरूडे यांनी सांगितले की, बेरोगारीची आकडेवारी पाहता देशातील ८२ टक्के पुरुष आणि ९२ टक्के महिलांना १० हजार रुपयांहून कमी वेतन मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. गेल्या पाच वर्षांत ८ हजार संगणक शिक्षकांना सरकारने घरचा रस्ता दाखविलेला आहे. ही गंभीर बाब आहे. दरवर्षी रोजगार निर्मिती करणे दूरच, मात्र आहे तो रोजगार काढून घेतला जात आहे. हजारो तरुण या रॅलीत सामील होतील. त्यासाठी विविध राज्यांतील विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
रोजगाराच्या मुद्द्यावर लाँग मार्चची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 1:28 AM