Join us  

बारमधील बांधकामांवर नजर

By admin | Published: July 29, 2014 1:34 AM

मूळ बांधकामात बदल करणाऱ्या बारवर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांनी महापालिकेला दिले आहे.

नवी मुंबई : मूळ बांधकामात बदल करणाऱ्या बारवर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांनी महापालिकेला दिले आहे. मूळ बांधकामात विनापरवाना बदल करून तेथे चोर कप्पे केले जात असून त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. अनेक बारवर कारवाईदरम्यान पोलिसांना ही बाब निदर्शनास आल्याने खबरदारी म्हणून पालिकेला हे पत्र देण्यात आले आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत परिमंडळ १ मध्ये गेल्या काही महिन्यात अनेक बारवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. निश्चित वेळेपेक्षा रात्री उशिरापर्यंत बार सुरु ठेवणे तसेच तेथील महिला वेटरकडून अश्लील हावभाव होणे अशा कारणांवरुन ही कारवाई झालेली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना अनेक बारमध्ये मूळ बांधकामात फेरबदल करून चोर कप्पे बनवले जात असल्याचे आढळून आले आहे. हे चोर कप्पे तयार करताना मूळ भिंती अथवा बीम हटवले जात आहेत. अशा बारवर पोलिसांचा छापा पडताच बारमधील महिलांना लपण्यासाठी या छुप्या जागांचा वापर केला जातो. अनेकदा बारमधील गायनाच्या व बैठकीच्या सोयीनुसार देखील तेथील मूळ बांधकामात बदल केला जातो. मात्र त्याकरिता महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देखील घेतली जात नाही. तर बांधकामात केल्या जाणाऱ्या या बदलामुळे इमारत ढासळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मूळ बांधकामात बदल झालेल्या बारच्या ठिकाणी गंभीर दुर्घटनेची शक्यता पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व बारची पाहणी करावी व मूळ बांधकामात बदल केल्याचे आढळणाऱ्या बारवर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी महापालिकेला केली आहे. यासंबंधीचे पत्र उपआयुक्त मेंगडे यांनी महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. भविष्यात अशा बारवर पालिकेचा हातोडा पडण्याची चिन्हे दिसत आहेत. बारमधील गैरहालचालीवर नजर ठेवून नवी मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या सातत्याच्या कारवाईमुळे सध्या बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. अशातच पालिकेकडून दुर्लक्षित झालेल्या बाबींवर देखील पोलिसांची चौकस नजर असल्याचे यावरुन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)