मुंबई : लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भारतीय पर्यटकांना आकर्षित करून त्यांच्या विश-लिस्टमध्ये स्थान पटकावण्यासाठी लहान देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारी गोरेगाव येथे पार पडलेल्या ट्रॅव्हल मार्टमध्ये ५०हून अधिक देशांतील पर्यटनविषयक प्रचार मंडळांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. पर्यटन क्षेत्रातील विविध पर्याय घेऊन चर्चासत्र आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून हे देश स्थानिक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहेत.रवांडा, भूतान, इजिप्त, मालदीव, रोमानिया यांसारख्या सुमारे ५०हून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या प्रवास आणि पर्यटन क्षमतांचे सादरीकरण येथे पार पडलेल्या तीनदिवसीय कार्यक्रमात केले. यापैकी रवांडा देशाला २०१५ साली १४ हजार भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा पर्यटकांचा आकडा ३५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा रवांडाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. रवांडासाठी भारत हे चीननंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे टार्गेट टूरीस्ट डेस्टिनेशन आहे. त्यामुळे तेथील पर्यटन विभाग येथील पर्यटन क्षमतांचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणावर प्रचार करतो आहे.भूतानमध्येही २०१५ साली भेट दिलेल्या भारतीय पर्यटकांचा आकडा सुमारे ८० हजारांहून अधिक आहे. परिणामी, भूतानच्या अपेक्षा उंचावल्या असून, यंदा १ लाख ३० हजार ते दीड लाख भारतीय पर्यटक भेट देण्याची अपेक्षा त्यांच्या पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. रोमानिया आणि फिजीलादेखील पर्यटकांची पसंती मिळते आहे. त्यामुळे अनेक आॅफर देत हे देश भारतात त्यांच्या पर्यटनाचा प्रचार करताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)विविध देशांची झलक : थायलंडच्या पर्यटनमंत्री कोबकर्ण वट्टानवरंगकुल यांनी या वेळी प्रमुख उपस्थिती दर्शवली. या वेळी विविध देशांतील हजारो विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते. त्यातील बहुतेक स्टॉल्स संबंधित देशातील पर्यटनस्थळांची झलक दाखवत होते. त्यात इंडोनेशिया, टर्की, श्रीलंका, मॉरीशस, थायलंड, न्यूझीलंड, चीन, जपान, हाँगकाँग, मकाऊ, बांगलादेश, फिलिपिन्स, मालदीव, ओमान, भूतान, सेचेलेस, इस्रायल, रवांडा, रोमानिया, फिजी आणि ग्रीसचा समावेश आहे.
विदेशांची भारतीय पर्यटकांवर नजर
By admin | Published: February 25, 2016 4:20 AM