मुंबई : ‘ये है मुंबई मेरी जान..’ असे म्हणणाऱ्या मुंबईकरांना मुंबापुरीची आगळीवेगळी ओळख करून देण्यासाठी ‘लूक अप मुंबई’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रोजच्या धावपळीत घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून एका वेगळ्याच मुंबईनगरीचे दर्शन घडत आहे. मुंबईचे हेरिटेज वास्तू, स्थापत्यशैली आणि त्यांच्या रचनेतील वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यता या प्रदर्शनाद्वारे उलगडण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सुरू असलेले हे प्रदर्शन युनिव्हर्सिटी आॅफ न्यू साऊथ व्हेल्स, आॅस्ट्रेलिया यांच्या साहाय्याने आयोजित केले आहे. साराह केंडरडीन, बेन्डर्ट लिंटरमन, जॅफ्री शॉ आणि हाँगकाँग छायाचित्रकार जॉन छॉय या कलाकारांच्या चमूने प्रदर्शनासाठी काम केले आहे.प्रदर्शनासाठी वस्तुसंग्रहालयात तात्पुरत्या स्वरूपातील डोम लॅब उभारली आहे. १८ मीटर उंच असणाऱ्या या डोम लॅबमध्ये थ्रीडी स्वरूपातील मुंबापुरीचे दर्शन ६0 फिशआय लेन्सद्वारे दाखविण्यात आले आहे. मुंबईच्या हेरिटेज वैभव संस्कृतीतील ताज हॉटेल, अफगाण चर्च, उच्च न्यायालय, सीएसटी, गेट वे आॅफ इंडिया, एलिफंटा लेणी, जनरल पोस्ट आॅफिस, पॅगोडा, सिद्धिविनायक मंदिर, राजाबाई टॉवर, होली कॅथड्रल चर्च अशा वास्तूंचा समावेश आहे. या प्रदर्शनाविषयी संग्रहालयाचे महासंचालक सब्यसाची मुखर्जी यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञानाचे विस्तारलेल्या युगात संग्रहालय क्षेत्राने घेतलेल्या पुढाकारचे हे उत्तम सादरीकरण आहे. या अद्भुत कलाकृतींचा अनुभव अधिकाधिक पर्यटकांनी घ्यावा.
मुंबईकडे बघा वेगळ्या नजरेतून!
By admin | Published: February 19, 2016 2:41 AM