Join us

मोफत धान्य वाटपाकडे गरजूंची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 7:30 PM

15 एप्रिल पर्यंत केवळ प्रतिक्षा,  अनेक ठिकाणी रेशन दुकाने बंद असल्याने त्रास

खलील गिरकर

मुंबई : केंद्र सरकारने गरीबांना मोफत धान्य वाटपाची घोषणा केली असली तरी शिधावाटप दुकानांमध्ये मात्र काहीशी अस्वस्थता आहे. सध्या एप्रिल महिन्याचे नियमित धान्य वाटप केले जात आहे. 10 एप्रिल पर्यंत हे वाटप पूर्ण झाल्यानंतर 15 एप्रिल पासून मोफत तांदूळ वाटप केले जाणार आहे. मात्र हे मोफत तांदूळ सरसकट सर्व नागरिकांना देण्यात येणार नसून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. 

मात्र नागरिकांमध्ये त्याबाबत संभ्रम असल्याने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक रेशन दुकानदारांकडे सातत्याने चकरा मारुन मोफत धान्य कधी मिळणार याची विचारपूस करत आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या शंकांचे निरसन करता करता रेशन दुकानदार कंटाळले आहेत. मुंबईत गोवंडी व इतर भागात अनेक रेशन दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जी दुकाने उघडली आहेत त्यातील काही दुकानांमध्ये पुरेसे गहू व तांदूळ उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील नाराजीचे वातावरण आहे. 

गोवंडीतील रस्ता क्रमांक 8 वरील रेशन दुकान गेल्या चैर दिवसांपासून बंद होते त्याची तक्रार केल्यानंतर दुकान उघडण्यात आले मात्र तांदूळ उपलब्ध नसल्याचे कारण सांगत पुन्हा काही कालावधीत दुकान बंद करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अतिक खान यांंनी दिली. अनेक दुकानदार पुरेसा धान्य पुरवठा नसल्याने ग्राहकांना पुन्हा येण्यास सांगतात. अनेक दुकानांमध्ये बिल दिले जात नाही अशी तक्रार त्यांनी केली.  मुव्हमेंट ऑफ पीस अँन्ड जस्टीसचे रमेश कदम म्हणाले, मुंबई व परिसरात अनेक रेशन दुकाने बंद आहेत. वाशी मध्ये बंद असलेले दुकान मंगळवारी उघडण्यात आले. त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. सरकारने तीन महिन्याचे धान्य एकत्र देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारने घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरु झालेली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

दुसरीकडे, सरकारने आम्हाला मोफत धान्य वाटप करायला सांगितले असले तरी नागरिकांना तोंड देणे आम्हाला अशक्य होत असल्याने सरकारने मोफत धान्य आमदार, खासदार व नगरसेवकांच्या माध्यमातून वाटप करावे असा सल्ला काही रेशन दुकानदारांनी दिला आहे.  नागरिक मोफत धान्याबाबत चौकशी करण्यासाठी वारंवार येतात व आम्ही अनेकदा सांगूनही त्यांचे समाधान होत नाही त्यामुळे 15 पासून तांदूळ वाटप करताना गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारु म्हणाले, शहरातील बहुसंख्य दुकाने  सुरु आहेत. काही बंद असतील तर ती त्वरित चालू केली जातील. काही ठिकाणी दुकानदारांना आवश्यक मदतनीस उपलब्ध होत नसल्याने दुकानदारांना सर्व कामे करावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

.................................

धान्य वाटपाचा मोबदला  : रेशन दुकानदारांना सध्या प्रति किलो दीड रुपये मोबदला मिळतो मात्र प्रति माणसी पाच किलो विनामूल्य देण्यात येणाऱ्या तांदूळ वाटपाबाबत मोबदल्याचा काहीही विचार सरकारने केलेला नाही. याबाबत विचार व्हावा अशी मागणी मारु यांनी केली आहे. 

..................................

दुकानदारांच्या सुरक्षेचे काय, विमा हवा :इ पॉस मशीनवर ग्राहकांना अंगठा लावण्यास मनाई करण्यात आली असली तरी दुकानदारांना व्यवहार झाल्यावर अंगठा लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना ग्लोव्हज वापरता येणे शक्य होत नाही परिणामी त्यांना  धोका निर्माण होत आहे. ग्राहकांना स्वाक्षरी करण्याची सक्ती आहे. ग्राहक स्वत: पेन आणत नाहीत. त्यांच्यासाठी वेगळे पेन ठेवले तरी एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाला संसर्ग होण्याची भीती कायम आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये सुरक्षिततेबाबत काळजी आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जीव धोक्यात घालून सेवा पुरवणाऱ्या रेशन दुकानदारांचा सरकारने विमा काढावा अशी मागणी केली जात आहे

टॅग्स :अन्नमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस