गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: सुशांत सिंह राजपूत (३४) आत्महत्या प्रकरणी रिया विरोधात 'लुक आऊट' नोटीस जरी करण्यात येणार असल्याचे पाटणा पोलिसांकडून सांगण्यात आले. तिच्या विरोधात सक्षम पुरावे त्यांच्या हाती लागल्याने लवकरच तिच्याविरोधात अटक वॊरंट जारी केले जाणार असल्याचीही शक्यता आहे.
रियाच्या विरोधात सुशांतच्या वडीलांनी पाटणा पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. तिच्यावर अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केले होते. त्यानुसार पाटणा पोलिसांचे पथक मुंबई दाखल झाले आणि त्यानंतर तपासाला गती प्राप्त झाली. रियाने व्हिडीओ व्हायरल करत ती निर्दोष असुन तिच्याविरोधात खोटे आरोप करत तिला फसविले जात असल्याचे तिचे म्हणणे होते. मात्र पाटणा पोलिसांसमोर तपासाला हजर न होणाऱ्या रियाच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सुशांतचे वडील के के सिंग यांचे वकील विजय सिंग यांना याबाबत विचारले असता ती तपासासाठी समोर येत नसल्याने पोलिसांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. मात्र लूक आऊट नोटीसबद्दल मला अद्याप कल्पना नसून मी त्याबाबत माहिती घेतो असे उत्तर त्यांनी 'लोकमत' शी बोलताना दिले.