मनोहर कुंभेजकर
मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून दहिसरनदी वाहते. मात्र, नदी सभोवताली झालेले अतिक्रमण, नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी आणि येथील बंद झालेले नैसर्गिक झरे, नदीत साचलेला गाळ यामुळे दहिसर नदी सध्या मृतावस्थेत आहे. दहिसर नदीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री व उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून दहिसर नदीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. दहिसर नदीला पुनर्जीवित करण्याचा सुमारे 280 कोटींचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महापालिका साकारणार आहे.
या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ येत्या 8 ते 10 दिवसात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिववसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या स्थानिक नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी लोकमतला दिली. यावेळी ठाकरे यांच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांची त्यांनी स्वतः पाहणी केली. तसेच नदीकिनारी उभारण्यात आलेल्या आशीर्वाद कट्ट्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी दहिसर नदीच्या नियोजित प्रकल्पाची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या. येत्या 2-3 दिवसात सह्याद्री अतिथी गृहात बैठक आयोजित आजच्या पाहणी दोऱ्यात झालेल्या चर्चेचा आढावा ते घेणार असल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या. दहिसर नदीतील सांड पाण्यावर ट्रीटमेंट करून परत चांगले पाणी नदीत सोडणे, सांड पाण्याचे आउटलेट बंद करणे, नदीच्या दोन्ही बाजूला नागरिकांना बसण्याची व्यवस्था करणे, सायकलिंग ट्रक उभारणे, दहिसर नदीत बोटींग सुरू करणे आणि अन्य उपक्रम येथे सुरू करण्यात येणार असल्याने दहिसर नदीचा लूक आउट बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी बृहन्मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, मागठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, परिमंडळ ७ च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्ता मृदुला अंडे तसेच इतर शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.