मुंबई : गुंतवणुकीवर महिन्याला दीड ते दोन टक्के नफा देण्याच्या नावाखाली हजारो गुंतवणूकदारांना गंडवून सीए अमित दलाल पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या विरुद्ध लूक आउट नोटीस जारी केली आहे.
अमित दलाल याने भारतासह लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह चायना येथील गुंतवणूकदारानाही फसवल्याची माहिती समोर येत आहे. दलाल याने आतापर्यंत १ हजार २३ गुंतवणूक दारांना कोट्यवधी रुपयांना गंडविले आहे. दलाल हा रिट्स कन्सल्टन्सी कंपनीचा मालक आहे. जुहू येथील फॅशन डिझायन महिलेच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी दलाल विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, मित्राच्या ओळखीतून एप्रिल २०२३ मध्ये तक्रारदार यांची दलाल सोबत ओळख झाली. दलालने गुंतवणुकीवकर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. तो गुंतवणुकीवर महिन्याला १.५ टक्के तर १.८ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढायचा. महिलेने वर्षभरात ५४ लाखांची गुंतवणूक केली. सुरुवातीला नियमित महिन्याकाठी नफा मिळत असल्याने त्यांचा विश्वास बसला.
मार्च महिन्यापासून कंपनीने नफा देण्यास बंद केला. दलालकडे विचारणा करत तो वेगवगेळी कारणे पुढे करू लागला. त्यातच त्यांच्याप्रमाणे अनेकांना त्याने अशाप्रकारे गंडविल्याचे समोर येताच त्यांना धक्का बसला . १४ मार्चनंतर दलाल पसार झाल्याचे समजताच तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. दलाल याला पकडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा विरुद्ध लूक आउट नोटीस जारी केली आहे. तसेच त्यांच्या बँक खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे.दलाल स्कीमच्या जाळ्यात व्यावसायिक, वकील अन..
गुंतवणूकदारांनी दलाल स्कीममध्ये १० लाख ते १० कोटी पर्यंत गुंतवणूक केली आहे. यामध्ये व्यवसायिकांसह वकील सीए तसेच चित्रपट सृष्टीतील मंडळींनीही गुंतवणूक केली आहे. अभिनेता अनु कपूर यांची देखील यामध्ये फसवणूक झाली आहे.खात्यात फक्त ५० हजार
दलाल हा विश्वास संपादन करण्यासाठी गुंतवणूक दारांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा पुढील तारखेचा धनादेश दिले होते. स्कीममधून बाहेर पडायचे असल्यास गुंतवणूकदार पैसे काढू शकत असल्याचे सांगितले. दलाला पसार झाल्याचे समजताच अनेकांनी बँकेतून पैसे काढण्यासाठी धाव घेतली मात्र त्याच्या बँक खात्यात अवघे ५० हजार रुपये शिल्लक असल्याचे समजताच गुंतवणूक दारांना धक्का बसला आहे.