लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या पोर्न फिल्म प्रोडक्शन रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या लंडनस्थित केनरीन प्रायव्हेट लिमिटेड या प्रोडक्शन कंपनीचा मालक प्रदीप बक्षीला गुन्हे शाखेने फरार घोषित केले आहे. त्याच्याविरोधात लूक आउट नोटीसही जारी केली आहे. बक्षी हा कुंद्राचा भावजी असून कुंद्रा बरोबर बक्षीही यातील मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणातील चौकशीत उमेश कामतने दिलेल्या माहितीत लंडनस्थित असलेल्या केनरीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी आहे. कुंद्रा याने ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सौरभ कुशवाह सोबत भागीदारीत आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करून केनरीन कंपनीसाठी हॉटशॉट हे ॲप विकसित केले होते. याच ॲपवरून पोर्न फिल्म प्रसारित करण्यात येत होत्या. पुढे कारवाईच्या भीतीने जुलै ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत हे ॲप २५००० डॉलर किमतीला केनरीन कंपनीला विकले. कुंद्राच्या सांगण्यावरून कामत हा केनरीन प्रायव्हेट कंपनीच्या भारतातील को कॉर्डिनेटर म्हणून त्याच्याच अंधेरीतील कार्यालयातून याचे कामकाज पाहत होता. पुढे, ११ डिसेंबर २०१९ रोजी कुंद्रा यांने या कंपनीचा राजीनामा दिल्यानंतर आता अटकेत असलेला कंपनीचा कर्मचारी रायन थॉर्प हा हॉटशॉट ॲपबाबत माहिती घेत होता.
बक्षी हा लंडनमधून हे रॅकेट चालवत होता. भारतातील अश्लील चित्रपटाची बक्षी परदेशात विक्री करायचा. बरेचसे बँक व्यवहारही समोर आले आहेत. तसेच कुंद्रा यांच्या हॉटशॉट संबंधित व्हॉट्स ग्रुपमधील कुंद्रा आणि बक्षी यांच्यातील चॅटही मालमत्ता कक्षाने ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात यश ठाकूर ऊर्फ अरविंदकुमार श्रीवास्तवचाही शोध सुरू आहे.
विआन इंड्रस्ट्रीजच्या कार्यालयात झाडाझडती
कुंद्राच्या विआन इंड्रस्ट्रीजच्या विविध कार्यालयांत गुन्हे शाखेकडून झाडाझडती सुरू आहे. याप्रकरणात महत्त्वाचे पुरावे मालमत्ता कक्षाकडून जप्त करण्यात येत आहेत.