अनिल देशमुख यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:10 AM2021-09-06T04:10:03+5:302021-09-06T04:10:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्राथमिक चौकशीचा अहवाल लिंक केल्याच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल करत सीबीआयने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्राथमिक चौकशीचा अहवाल लिंक केल्याच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल करत सीबीआयने धडक कारवाई सुरू केल्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लूक आउट नोटीस बजावल्याचा दावा देशमुख यांच्या विरोधातील याचिकाकर्त्या ॲड. जयश्री पाटील यांनी केला आहे. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
देशमुख यांनी देश सोडून जाऊ नये, यासाठी लूक आउट नोटीस बजावण्यात येते. लूक आउट नोटीस जारी करण्यात आल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर त्यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने याप्रकरणी चौकशी करत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारे गुन्हा दाखल करून ईडीने देशमुखांचे स्वीय सहायक आणि खासगी सचिव यांना अटक केली आहे. ईडीने देशमुखांची मालमत्ता जप्त करत त्यांना तब्बल पाच वेळा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले. मात्र, अद्याप ते हजर राहिलेले नाहीत.