रियाविरोधात ‘लूक आउट’ नोटीस जारी होणार! आदित्य ठाकरे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 07:01 AM2020-08-02T07:01:32+5:302020-08-02T07:02:39+5:30
सुशांत राजपूत आत्महत्या; पाटणा पोलिसांची माहिती; सबळ पुरावे मिळाल्याने अटकेची शक्यता
मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीविरोधात ‘लूक आउट’ नोटीस जारी करणार असल्याचे पाटणाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रियाविरोधात आमच्या हाती अत्यंत महत्त्वाचे पुरावे लागले आहेत, जे न्यायालयात तिला दोषी सिद्ध करू शकतात. त्यानुसार तिच्याविरोधात ‘लूक आउट’ नोटीस जारी करणार असल्याचे पाटण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सुशांतचे वडील के. के. सिंग यांचे वकील विजय सिंग यांना या नोटीसबद्दल मला कल्पना नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, पाटणा पोलिसांनी शुक्रवारी सुशांतच्या वांद्रे येथील घरातून काही साहित्य हस्तगत केले. त्यातून त्यांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. पाटणा पोलिसांकडून नोटीस मिळाली नाही. त्यांनी रियाच्या घरीही भेट दिलेली नाही, अशी माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.
सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची मागणी पाटणा पोलिसांनी केली असता तो त्यांना दिला नाही. तपासासाठी त्यांना रिक्षातून फिरावे लागत असून महिला पोलिसाचीही मदत पुरविली नाही, अशा चर्चा सध्या रंगत आहेत. मात्र यात तथ्य नसल्याची माहिती बिहारचे डीजीपी गुप्तेशवर पांडे यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार यांनी शनिवारी मुंबई पोलिसांची भेट घेतली. कोविडची लागण झाल्याचे तत्काळ लक्षात यावे यासाठी अक्षय कुमारने हे रिस्ट बॅण्ड पोलिसांना दिले, त्यानिमित्ताने ही भेट झाली असली तरी सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात दिवसभर या भेटीची चर्चा रंगली होती.
‘ते’ सर्व्हर भारतात नाही
रिया चक्रवर्तीला इन्स्टाग्रामवर ‘तू आत्महत्या कर अथवा तुझ्यावर
बलात्कार करून ठार मारू,’ अशी धमकी ेंल्लल्ल४_१ंं४३ या अकाउंटवरून मिळाली होती. या प्रकरणी दोन इन्स्टाग्राम
अकाउंटची माहिती घेतली असून त्याचे सर्व्हर भारतात नसल्याची माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरगावकर यांनी दिली.