आर्थिक व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर
By admin | Published: September 22, 2014 11:41 PM2014-09-22T23:41:09+5:302014-09-22T23:41:09+5:30
विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता निवडणूक विभागाबरोबरच पोलिसांनी कंबर कसली आहे.
पनवेल : विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता निवडणूक विभागाबरोबरच पोलिसांनी कंबर कसली आहे. पैशांचा वापर होऊ नये याकरिता आर्थिक व्यवहारावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. त्या संदर्भात बँकांना पत्र देण्यात येणार असल्याचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले.
मतदारांना प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग असल्याने त्याचे पालन व्हावे याकरिता विशेष खबरदारी घेतली जात आहे. निवडणुकीच्या काळात पैसे खर्च करण्यावरही मर्यादा घालण्यात आली असतानाही चोरट्या मार्गाने पैशांचा वापर केला जात असल्याच्या घटना अनेक ठिकाणी मागील निवडणुकीत उघडकीस आल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत अशाप्रकारे पैशांचा वापर होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांनी सुध्दा पोलिसांना आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना निर्गमित केले आहे.
जास्त रकमेचा व्यवहार होत असेल तर त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी अशा सूचना बँकांना देण्यात येणार आहे. संबंधित व्यवहाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. त्याचबरोबर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)