प्रदूषण मंडळाची आवाजी फटाक्यांवर करडी नजर
By admin | Published: October 22, 2014 01:31 AM2014-10-22T01:31:11+5:302014-10-22T01:31:11+5:30
दिवाळी म्हटली की जल्लोष आणि उत्साहाची सांगड. दिवाळीत सर्व जण आतषबाजी आणि फटाके फोडतात. मात्र फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते
पूनम गुरव, नवी मुंबई
दिवाळी म्हटली की जल्लोष आणि उत्साहाची सांगड. दिवाळीत सर्व जण आतषबाजी आणि फटाके फोडतात. मात्र फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कंबर कसली आहे. जनजागृती मोहीम त्याचबरोबर १० विविध केंद्रांच्या माध्यमातून ध्वनीची तीव्रता मोजण्यात येणार आहे.
लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या तिन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे निवासी विभागात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. प्रदूषणावर लक्ष आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण विभागाच्या वतीने नवी मुंबईतील महत्त्वाच्या १० ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषणच्या वतीने केंद्रे उभारण्यात आली असून याद्वारे ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप करण्यात येणार आहे. सीबीडी, नेरूळ सेक्टर ११,वाशी सेक्टर १, ९ आणि १५, कोपरखैरणे सेक्टर १०,ऐरोली, रबाळे, घणसोली,बालाजी टॉवर याठिकाणी केंदे्र उभारण्यात आली आहेत. यामार्फत प्रत्येक विभागात ध्वनिप्रदूषण अधिक प्रमाणात झाले आहे याची २४ तासांची नोंद करण्यात येणार आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार निवासी क्षेत्रात दिवसा आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल इतकी असली पाहिजे. वाणिज्य क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबलची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र सणासुदीच्या काळात प्रामुख्याने दिवाळीत निवासी विभागात आणि सायलेंट झोनमध्ये या ध्वनी मर्यादेचे सर्रासपणे उल्लंघन होते. फटाक्यांच्या ध्वनीचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. तसेच प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वाढत्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रणच्या वतीने विशेष पथके तयार केली आहेत.