२० रुपयांत बघा शाहरूख आणि सलमानचा बंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 03:05 AM2018-07-02T03:05:06+5:302018-07-02T03:05:24+5:30
‘भाई लोग...सलमान, शाहरुख का बंगला देखना है तो इधर आओ. खाली बीस रुपये मे बंगला देखने मिलेगा. सेल्फी भी निकालने को मिलेगा. समुंदर की हवा भी खाने को मिलेगी. जल्दी आओ, जल्दी आओ; एकीच सीट बचेलाय...
- सागर नेवरेकर
मुंबई : ‘भाई लोग...सलमान, शाहरुख का बंगला देखना है तो इधर आओ. खाली बीस रुपये मे बंगला देखने मिलेगा. सेल्फी भी निकालने को मिलेगा. समुंदर की हवा भी खाने को मिलेगी. जल्दी आओ, जल्दी आओ; एकीच सीट बचेलाय...’ खरं तर या भाषेची व्याख्या ‘बंबईया हिंदी’ अशी केली जाते आणि हीच भाषा तुम्हाला-आम्हाला सर्वत्र दिसते, पण २० रुपयांत शाहरुख आणि सलमानचा बंगला? हे कसे शक्य, असा प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तर वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळेल.
वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानक ते बँड स्टँड असा प्रवास रिक्षाने २० रुपयांत करा, असे रिक्षाचालक वांद्रे स्थानकाच्या बाहेर मोठ्याने ओरडताना आढळतात. शनिवार-रविवार शाहरुख आणि सलमान खानचा बंगला बघण्यासाठी एकच गर्दी बँड स्टँड परिसरात जमू लागते.
बँड स्टँड हे समुद्र किनाऱ्याजवळ असलेले आणि बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांचे वास्तव्य असलेले स्थान आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. मोठी गर्दी होत असल्याने, रिक्षाचालकांनाही कमी दरात चांगले भाडे मिळते. त्यामुळे २० रुपयांत शाहरुख खानचा बंगला बघा, २० रुपयांत सलमान खानचा बंगला बघा, अशा प्रकारे रिक्षाचालकांची आरडाओरड सुरू असते.
पडद्यावर दिसणाºया कलाकाराला प्रत्यक्षात पाहण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेशातून मुंबईत आलो आहोत. शाहरुख खानचा बंगला पाहिला, परंतु शाहरुख खान काही दिसला नाही. शाहरुख खानबाबत विचारणा केली असता, सुरक्षा रक्षकांने सांगितले की, शाहरुख खान दुबईला गेला आहे. अभिनेते
कुठेही जात नाहीत, परंतु सुरक्षा
रक्षक गर्दी कमी करण्यासाठी खोटे बोलतात, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशवरून आलेल्या एका चाहत्याने दिली.
सलमान खानचे सर्व चित्रपट पाहतो. जेव्हा कधी मुंबईला कामानिमित्त येतो, तेव्हा बँड स्टँडला येऊन जातो, परंतु सलमान खानचे आतापर्यंत दर्शन झाले नाही. त्यामुळे सलमान खानला न बघताच परतावे लागते. आताही मुंबईत आलो, तर येथे येऊन जावे म्हणून आलो. मात्र, सुरक्षा रक्षक बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊ देत नाही, अशी प्रतिक्रिया सलमानचा चाहता आशफाक यांनी दिली.
सेल्फी पाँइंट : शाहरुख आणि सलमान खान यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते, तसेच शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ आणि सलमान खानचा बंगला ‘गॅलेक्सी’च्या प्रवेशद्वाराजवळ चाहत्यांनी सेल्फी पाँइंट सुरू केला आहे. चाहते सेल्फी घेऊन सोशल मीडियावर अपलोड करून लाइक्स आणि कमेंट मिळवितात. यातून समाधान मिळते, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली.
वाहतूककोंडी : अभिनेत्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करून चाहते फोटो सेशन करत असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होते, तसेच अनधिकृत पार्किंगमुळे ही वाहतूककोंडी होत असते.
रिक्षाचालकांकडून लूट : काही चाहते बाहेरच्या राज्यातून आलेले असतात, तर रिक्षावाले या चाहत्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे सांगून त्यांच्याकडून जास्त पैसे आकारतात. रिक्षाचालकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.