‘टॉप मोस्ट’ संवेदनशील विभागांवर करडी नजर

By admin | Published: February 8, 2016 02:55 AM2016-02-08T02:55:28+5:302016-02-08T02:55:28+5:30

अत्यंत सतर्क आणि न्यायप्रिय अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांची ओळख बनली आहे. सध्या देशमुख यांच्याकडे परिमंडळ १०ची जबाबदारी आहे.

Look at the 'top most' sensitive departments | ‘टॉप मोस्ट’ संवेदनशील विभागांवर करडी नजर

‘टॉप मोस्ट’ संवेदनशील विभागांवर करडी नजर

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर ,  मुंबई
अत्यंत सतर्क आणि न्यायप्रिय अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांची ओळख बनली आहे. सध्या देशमुख यांच्याकडे परिमंडळ १०ची जबाबदारी आहे. अत्यंत संवेदनशील विभाग म्हणून परिमंडळ १०कडे पाहिले जाते. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी विभाग, विविध जाती धर्मांच्या लोकांचा रहिवास येथे आहे. दाटीवाटीने असलेल्या या झोपड्यांमध्येच गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे प्रमाणदेखील तितकेच किचकट. मात्र आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणि स्थानिकांनाही सोबत घेऊन देशमुख यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले आहे.
देशमुख यांच्या अखत्यारीत असणाऱ्या विभागात कायदा आणि सुव्यवस्था योग्य ठेवण्यासाठी येथील ‘टॉप मोस्ट’ संवेदनशील भागांची एक वेगळी यादी सर्व पोलीस ठाण्यांकडून तयार करण्यात आली आहे. त्यानुसार या विभागांवर लक्ष ठेवण्यासाठी येथील गस्तदेखील वाढविण्यात आली आहे. प्रत्येक भागात एक विशेष डायरी ठेवण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याची नोंद डायरीत करावी लागते. तसेच या विभागातील मोहल्ला कमिटीदेखील अत्यंत सक्रियपणे कार्यरत आहे. हे श्रेयदेखील देशमुख यांना जाते. त्यामुळे एकतर पोलिसांची गस्त आणि स्थानिकांचे सहकार्य यांची चांगली सांगड बसविण्यात पोलीस दलाला यश आले आहे. त्यामुळे गुन्हा आणि गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी या नेटवर्कची चांगली त्यांना मदत होते. यासाठीच ‘आईज एण्ड इअर’ ही संकल्पनादेखील परिसरात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ज्यात स्थानिक लोकच पोलिसांचे कान आणि डोळे बनल्यामुळे या विभागातील घडामोडींची खडान्खडा माहिती पोलिसांना मिळते, असे साकीनाका पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
झोपडपट्टीमध्ये होणारा अनैतिक व्यापार, देह व्यापार, अमलीपदार्थांची विक्री किंवा काही संशयित हालचालींची माहिती वेळीच पोलिसांना मिळणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरून या कारवाया रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे पोलिसांना शक्य होते.
ही बाब लक्षात घेवून देशमुख यांनी ‘आइज एंड इअर्स’ ही संकल्पना येथे राबवणे सुरू केले. त्यामुळे अनेकदा गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांचा कट उधळणे पोलिसांना शक्य झाले आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षेबाबतदेखील या झोनमध्ये अत्यंत सतर्कता बाळगली जाते. मेघवाडी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या झोनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेची तक्रार ही गांभीर्याने नोंदविली जाते. ज्यावर स्वत: या विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष ठेवून असतात. अनेकदा महिला खोट्या तक्रारीदेखील करतात. असे असले तरी महिलांची तक्रार दाखल करवून घेण्याला प्राधान्य दिले जाते. देशमुख यांनी अमलीपदार्थविरोधी पथकातही काम केल्याने या विभागात अमलीपदार्थांशी संबंधित गुन्ह्यांवरदेखील त्यांचे बारीक लक्ष असते. देशमुख यांच्या या सर्व धोरणांमुळे त्यांच्यासोबत काम करणारे
अधिकारी तसेच कर्मचारीदेखील आत्मविश्वासाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. ‘घरगुती हिंसे’विरुद्ध जनजागृती
परिमंडळ दहाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये असलेले ‘महिला तक्रार निवारण कक्ष’ यावर देखील देशमुख यांचे लक्ष असते. कारण या परिसरात घरगुती हिंसेचे प्रमाण हे इतर गुन्ह्यांपेक्षा जास्त आहे. ज्यात नवरा बायकोच्या भांडणांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या कक्षात जोडप्यांचे समुपदेशन केले जाते.
अशा प्रकारे अद्याप अनेक कुटुंब विखुरण्यापासून बचावली आहेत. पोलिसांच्या भीतीने महिलांवर पतीकडून होणारे अत्याचाराचे प्रमाणही रोडावले आहे. महिला आणि लहान मुलांच्या तक्रारी गांभीर्याने नोंदवण्याचे निर्देश आहेत. ज्यावर देशमुख स्वत:हून लक्ष घालतात. महिलांच्या तक्रारी महिलांनी दाखल करून घ्याव्यात, असेही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे येणारी महिला ही तिची तक्रार दुसऱ्या महिलेला निर्धास्तपणे सांगू शकते.

Web Title: Look at the 'top most' sensitive departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.