मुंबई : पर्यटन केवळ मनोरंजन आणि मौजमजेचे माध्यम नसून त्याकडे ज्ञानवृद्धीच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे जगभरातून मुंबईत दाखल झालेल्या पर्यटनतज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले. पर्यटनाकडे सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. पर्यटन करताना स्वच्छता आणि सुरक्षितता हे कळीचे मुद्दे असल्याचेही मत आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेत तज्ज्ञांनी मांडले. विलेपार्ले येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयात ही आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत रोहतक येथील महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्रा. रोहिणी अग्रवाल, पुणे येथील सावित्रीबाई विद्यापीठाचे हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. सदानंद भोसले, मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. हर्षदा राठोड, मणिबेन नानावटी महिला महाविद्यालय हिंदी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र कात्यायन आदींची परिषदेला उपस्थिती होती. देश-विदेशातील संशोधकांचा परिषदेत सहभाग होता. जगातील धार्मिक स्थळेदेखील पर्यटनाशी निगडित असून, महिला आणि युवांचे स्थान या क्षेत्रात महत्त्वाचे असल्याचे उपस्थितांनी या वेळी सांगितले. पर्यटन करताना लोकांच्या पीडा, यातना समोर आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा. जगासमोर हे प्रश्न आणायला हवेत. त्यातून पीडितांसाठी मदतीचा हात पुढे येईल. सांस्कृतिक पर्यटनाबद्दल अज्ञान सध्या सर्वदूर असून, ते दूर करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरजही या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)‘संवेदनशील नागरिक होणे गरजेचे’आपण तळपत्या ज्वालामुखीवर बसलो आहोत. सांस्कृतिक शुद्धतेचा आणि उग्रवादाचा ज्वालामुखी सध्या धुमसत आहे. आदिवासींना हिनतेची वागणूक दिली जाते. अल्पसंख्याकांना लोक स्वीकारत नाहीत. पर्यटनातून भारतीय संस्कृतीला जोडण्याचे कार्य घडते. पर्यटनाला केवळ पैशांनी तोलता येणार नाही. पर्यटनाच्या वृद्धीसाठी संवेदनशील नागरिक होणे गरजेचे आहे. पर्यटन साहित्य, संस्कृती आणि मनुष्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.- प्रा. रोहिणी अग्रवाल, महर्षी दयानंद महाविद्यालय, रोहतक‘नैसर्गिक पर्यटन आदिवासींमुळे टिकून’नैसर्गिक पर्यटन आदिवासी लोकांमुळे टिकून आहे. भारतीय पर्यटन चारही दिशांमध्ये पसरलेले आहे. आदिवासी समाजात जेव्हा मुलीचे लग्न ठरते तेव्हा हुंडा मागितला जात नाही; तर तुमच्या बागेतील एक फूल आम्हाला मिळेल का? असे विचारण्याची प्रथा आहे. आदिवासी समाजामध्ये महिलांकडे अधिकार केंद्रित आहेत. ही संस्कृती समजावून घेणे त्यामुळेच गरजेचे ठरते. - सदानंद भोसले, हिंदी विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले महाविद्यालय, पुणे ‘पर्यटनाच्या सिद्धान्ताची मांडणी व्हावी’पर्यटन मोठा उद्योग असूनही त्याचा अभ्यास गंभीरपणे होत नाही. पर्यटनाचा अभ्यास अजूनही केवळ व्यवसायाच्या दृष्टीने होतो. पर्यटनाचा सिद्धान्त अजूनपर्यंत बनलेला नाही. त्यामुळे या सिद्धान्ताच्या मांडणीची गरज आहे. पर्यटनाचा अभ्यास शाळा, विद्यालय, महाविद्यालयांत व्हावा. पर्यटन सामाजिक आणि सांस्कृतिक संवादाचे माध्यम म्हणून ओळखले जावे. - डॉ. रवींद्र कात्यायन, हिंदी विभागप्रमुख, मणिबेन महाविद्यालय, मुंबई