कुर्ला बसस्थानकातील हिरकणी कक्षाला गोदामाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:05 AM2021-01-04T04:05:47+5:302021-01-04T04:05:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करून प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना केली होती; परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करून प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना केली होती; परंतु या कक्षाबाबत महिलाच अनभिज्ञ असून आता तर कुर्ला बसस्थानकातील हिरकणी कक्षाला गोदामाचे स्वरूप आले आहे.
कुर्ला बसस्थानकातील हिरकणी कक्ष तर कुलूपबंदच होता. विशेष म्हणजे त्यावर साधा फलकही लावण्यात आला नव्हता. हिरकणी कक्षात जुने टेबल आणि कपाट आहे. पण, महिलांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. सर्व ठिकाणी धूळ साचली आहे.
एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अनेक महिलाही आपल्या चिमुकल्या बाळांना घेऊन असतात. बसची वाट पाहताना भूक लागलेल्या बाळाला अंगावरचे दूध पाजावे लागते. अशावेळी इतर प्रवाशांच्या नजरा चुकवण्यासाठी पदर झाकताना त्या मातेला मोठी कुचंबणा सहन करावी लागते. हे टाळण्यासाठीच बसस्थानकांवर हिरकणी कक्ष उभारले होते. बाळाला दूध पाजताना त्या कक्षात जायचे आणि पाजून झाल्यानंतर पुन्हा फलाटावरील बेंचवर येऊन बसावे, अशी ती व्यवस्था होती. त्या कक्षात लाइट, पंखा अशा सुविधाही दिल्या होत्या. मात्र, आता अवस्था बिकट झाली आहे.
मार्चपासून हिरकणी कक्ष बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिला हिरकणी कक्षात जाणे टाळत आहेत. प्रवासी महिलेने मागणी केल्यानंतर त्यांना ती चावी उपलब्ध करून दिली जाते. मात्र, कोरोनाच्या मार्चपासून काही महिने वाहतूक बंद होती. तेव्हापासून हिरकणी कक्ष बंद आहे, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
कक्षाची माहितीच नाही
तान्हे मूल असणाऱ्या महिलांसाठी अशी वेगळी खोली असल्यास त्यांना इतरांसमोर पाजण्याची वेळ येणार नाही. तशी सुविधा नेहमीसाठी असावी. बाळाला पाजण्यासाठी हिरकणी कक्षात बसण्याची व्यवस्था आहे, याची आम्हाला माहितीच नाही. हिरकणी कक्षाचा साधा फलकही लावण्यात आला नाही, असे एका महिला प्रवाशाने सांगितले.
दुरुपयोग टाळण्यासाठी कुलूपबंद
हिरकणी कक्षात कोणीही जाऊन बसू नये आणि त्या कक्षाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्याला कुलूप लावून ठेवले जाते. अनेकदा काही लोक तिथे जाऊन बसतात. आता ते बंद दिसत असले, तरी त्याची चावी चौकशी कक्षात असते. स्तनपान करण्यासाठी कोणी मागणी केल्यास कक्ष उघडून दिला जातो. माहितीसाठी दर १० मिनिटांनी उद्घोषणा केली जाते.
- अजित राजपूत, आगार व्यवस्थापक, कुर्ला