आरे कारशेडऐवजी पर्यायी जागा शोधणार; अहवाल देण्यासाठी शासनाने नेमली समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:55 AM2019-12-12T05:55:44+5:302019-12-12T06:19:43+5:30
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या या कापणीला नव्या सरकारने एकप्रकारे चौकशीच्या घेऱ्यात आणले आहे.
मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी सद्यस्थितीत निश्चित करण्यात आलेल्या आरेतील जागेऐवजी पर्यावरणीयदृष्ट्या योग्य व वाजवी किमतीमध्ये पर्यायी जागा उपलब्ध आहे का याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी एक समिती नेमली. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असून समितीस १५ दिवसात अहवाल देण्यास शासनाने सांगितले आहे.
नगरविकास विभागाने बुधवारी जीआर काढून ही समिती नेमली. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, मुंबई रेल विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वनसंरक्षक (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अन्वर अहमद हे समितीचे सदस्य आहेत. सद्य:स्थितीत आरे कॉलनीतील मेट्रो ३ कारशेडचे काम करताना त्या जागेवरील २१०० झाडांची कापणी करण्यापूर्वी विहित पद्धतीचा अवलंब केला होता की नाही या बाबतही अहवाल देण्यास समितीला सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या या कापणीला नव्या सरकारने एकप्रकारे चौकशीच्या घेऱ्यात आणले आहे. आरे कॉलनीती जमिनीच्या पर्यावरण रक्षणासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे या बाबतही समिती अहवाल देईल.
या कारशेडसाठी सद्यस्थितीत निश्चित करण्यात आलेल्या जागेवर निश्चित करण्यात आलेल्या जागेवर पर्यावरणीय समतोल साधणे, कारशेडचे बांधकाम करणे व त्या परिसरातील जतन करणे कसे शक्य होईल या बाबतही समिती अहवाल देणार आहे.
मेट्रो ३ साठी बांधण्यात येणाºया या कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ नोव्हेंबर रोजी स्थगिती दिली होती आणि या संदर्भात आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मेट्रो ३ प्रकल्पास स्थगिती देण्यात आली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
कापणी चौकशीच्या घेऱ्यात
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या आरे येथे करण्यात आलेल्या वृक्षांच्या कापणीला नव्या सरकारने एकप्रकारे चौकशीच्या घेऱ्यात आणले आहे. येथील जमिनीच्या पर्यावरण रक्षणासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे या बाबतही समिती अहवाल देणार आहे.