रोहितकडे नेतृत्व म्हणून पाहते, तो बोलायला लागला की आबा बोलतात असं वाटतं; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:47 PM2023-08-16T12:47:55+5:302023-08-16T12:49:12+5:30
आज माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची जयंती आहे.
मुंबई- आज माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची जयंती आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आर आर पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच यावेळी त्यांनी रोहित पाटील यांचे कौतुकही केले.
एकनाथ शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाचा घाट! मंत्रिमंडळातील तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना निमंत्रण
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकही दिवस असा जात नाही की आर आर आबांची आठवण येत नाही. त्यांनी राज्यासाठी आणि राष्ट्रवादीसाठी मोठं काम केलं आहे. महाराष्ट्रासाठी त्यांचं असलेले ऋणानुबंध हे राज्याची जनता कधीच विसरणार नाही. पक्षासाठी त्यांचं मोठं योगदान आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"आर आर आबांच्यानंतर वहिनींनी जबाबदारी घेतली. त्यांनी ती यशस्वी केली. यानंतर आता आम्ही एक नवीन नेतृत्व म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहतो. अनेकवेळा रोहित भाषण करत असताना डोळेबंद केले की आर आर आबाच भाषण करत असल्याचे वाटते. रोहित मेहनती मुलगा आहे. त्यांच कुटुंब सुसंस्कृत आहे. राज्यात जर नवीन पिढीला राजकारणात यायच असेल तर कुठल्याही नेत्याचा अभ्यास करुन पुढे कतृत्व दाखवायचं असेल तर आर आर पाटलांकडे एक आदर्श पुत्र, एक आदर्श नेता, आदर्श पती म्हणून त्यांची आठवण म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहिलं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
चोरडिया आणि पवार कुटुंबाचे फार जुने संबंध
सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्योगपती चोरडिया आणि पवार कुटुंब यांचे जुने संबंध आहेत. आम्ही एकमेकांच्या घरी नेहमी जातो. यात काही नवीन नाही, सहा दशकाहून जास्त संबंध आहेत. अनेकवेळा राजकीय मतभेद असतात. एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या शरद पवार यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. अनेक धोरणांमध्ये अनेक धोरणांमध्ये त्यांचे पटले नाही, यामुळे आरोप-प्रत्यारोप झाले. पण म्हणून आमच्या आत्याचे प्रेम कधीच कमी झाले नाही, किंवा आमचं आत्यावरचे प्रेम कधी कमी झाले नाही. यामुळे नात्यातील ओलावा कधीच कमी झाला नाही. हे उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे, दोन्ही नेत्यांना राज्यानं प्रेम दिलं, एका लोकशाहीमध्ये हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. अजितदादा यांना एका वैचारिक बैठकीत बसतात ते त्यांना योग्य वाटतं असेल आणि आम्ही एका वैचारिक बैठकीत बसतो ते त्यांच्या बाबतीत वेगळे असू शकतात यात काही गैर नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.