अकरावीसाठी स्वतंत्र सीईटी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या अंतिम निर्णयाची उत्सुकता ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:07 AM2021-05-13T04:07:27+5:302021-05-13T04:07:27+5:30
सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सुपूर्द, आता निर्णयाची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा अंतर्गत ...
सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सुपूर्द, आता निर्णयाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा अंतर्गत मूल्यमापनासाठी तयार आहेत का, याची चाचपणी करण्यासाठी आणि अकरावी प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी स्वतंत्र परीक्षेला सामोरे जाण्यास तयार आहेत का, हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण घेण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणामुळे विद्यार्थी निकाल आणि अकरावी प्रवेशाचा तिढा आणखी वाढला आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळांनी दिलेला प्रतिसाद आणि स्वतंत्र सीईटीसाठी विद्यार्थ्यांचा एकूण प्रतिसाद यात तफावत असल्याने निर्णय घेणे कठीण झाले आहे. मात्र, आता हा सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असून, त्यांच्याकडून अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शासन यावर काय निर्णय घेणार, याची उत्सुकता विद्यार्थी, पालकांसह शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांनाही आहे.
अंतर्गत मूल्यमापनासाठी सर्वेक्षणाअंती राज्यातील १७ हजार ७४३ शाळा तयार असून, ३ हजार ६८३ शाळांनी आपली तयारी नसल्याचे सांगितले आहे. एकूणच अंतर्गत मूल्यमापनासाठी सहभागी झालेल्या एकूण २१ हजार ४२६ शाळांपैकी ८३ टक्के शाळा या अंतर्गत मूल्यमापनासाठी तयार आहेत, तर १४ टक्के शाळांनी आपली तयारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून ज्या शाळांची अंतर्गत मूल्यमापनाची तयारी नाही, जेथे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन, ऑफलाईन, गृहभेटी, स्वाध्याय अशा कोणत्याही पद्धतींनी मूल्यमापन झालेच नाही तेथे शासन काय पर्याय सुचविणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, याअंतर्गत मूल्यमापनावर जर दहावीची गुणपत्रिका / निकाल दिले, तर त्यात कितपत पारदर्शकता असणार, याविषयी तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करत आहेत.
यंदा राज्य मंडळाची तब्बल १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून, सीबीएसई, आयसीएसई, आयजी आणि इतर मंडळांचे मिळून जवळपास १८ लाख विद्यार्थी राज्यातून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्पर्धेत उतरणार आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ सर्वेक्षणाअंती ३ लाख १ हजार विद्यार्थ्यांचे प्रतिसाद सर्वेक्षणासाठी प्राप्त झाले आहेत. त्यातील २ लाख विद्यार्थी स्वतंत्र परीक्षेसाठी तयार असून, १ लाख ८ हजार विद्यार्थ्यांनी यासाठी नकार दर्शविला आहे. एकूणच प्रतिसाद दिलेल्या विद्यार्थ्यांपैकीही ३५ टक्के विद्यार्थ्यांना स्वतंत्र सीईटी परीक्षा नको, तर ६५ टक्के विद्यार्थी यासाठी तयार आहेत. मात्र, अकरावी प्रवेशासाठी स्पर्धेत असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ २० टक्के विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या प्रतिसादाच्या आधारावर स्वतंत्र प्रवेश परीक्षेचा निर्णय घेणे कितपत व्यवहार्य ठरेल, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक उपस्थित करत आहेत. स्वतंत्र परीक्षा घेतलीच तरीही अकरावी प्रवेशाच्या विविध शाखा परीक्षेच्या प्रवेशांचे निकष कसे लावणार ? त्यासाठीही स्वतंत्र परीक्षा पुन्हा घेणार, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिक्षण विभागाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झालेला गोंधळ सर्वेक्षणांनी सुटणार आहे का ? असा सूर शिक्षण तज्ज्ञांमधून उमटत आहे. त्यामुळे आता यावर शासन काय निर्णय घेणार ? हा प्रश्न सोडविणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
०--------
चौकट
दहावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य होईल का ?
प्रतिसाद - टक्केवारी - शाळा संख्या (प्रतिसाद दिलेल्या )
होय - ८२. ८१ % - १७७४३
नाही - १७. १९ %- ३६८३
अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यावी का?
प्रतिसाद - टक्केवारी - विद्यार्थी संख्या (प्रतिसाद दिलेली )
होय - ६४. ९८%- २०२११७
नाही - ३५. ०७%- १०८९४९