दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा, मरीनड्राईव्ह येथील घटना
दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा, मरीनड्राईव्ह येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अचानक यु टर्न घेतलेल्या दुचाकीस्वाराकडे दुर्लक्ष केल्याच्या रागात दुचाकीस्वाराने कारमधील महिलेला पाहून अश्लील चाळे केल्याचा प्रकार मरीनड्राईव्ह परिसरात घडला. काही अंतरावर तो चालक पुन्हा दिसून येताच त्याला अडवून जाब विचारताच त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी घेत, चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वडाळा येथील रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय गृहिणी पती आणि दोन (३ आणि ६ वर्षाच्या) मुलांसोबत राहण्यास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ मार्च रोजी त्या पती, मुले आणि मैत्रिणीसोबत मरीनड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी फिरण्यासाठी रात्री
कारने निघाल्या. अशात रात्री सव्वा दहाच्या सुमारास एन.सी.पी.ए.वरून गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात असताना हॉटेल मरीन प्लाझासमोरील सिग्नलजवळ दुचाकीस्वाराने साउथ बाँडवरून यु टर्न मारल्याने तक्रारदार महिलेच्या पतीने त्यांची कार डाव्या बाजूस एकदम घेतली. त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाल्या. याच रागात, थोड्या अंतरावर गेल्यानंतर नमूद चालक हा त्यांच्या मागून येऊन त्यांना अश्लील हावभाव व अश्लील इशारे करू लागला.
त्यांनी याबाबत पतीला सांगितले. मात्र, वाहने जास्त असल्याने त्यांना दुचाकीस थांबविता आले नाही. त्यांनी गाडीचा क्रमांक बघून ठेवला. पुढे गिरगाव चौपाटी येथे ती दुचाकी दिसताच तक्रारदार यांच्या पतीने त्याच्याकडे जाब विचारला. तेव्हा त्याने त्यांच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी घेत, चालकाला ताब्यात घेतले. अशात, हे प्रकरण मरीनड्राईव्ह पोलिसांच्या हद्दीत घडल्याने त्यांना मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणून याबाबतची तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेश नंदकुमार म्हात्रे (वय २८) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो डोंगरीचा रहिवासी असून खासगी कंपनीत नोकरी करतो. याप्रकरणी मरीनड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.